दिवाळीचा उत्साह देशभरात सुरु आहे. दिवाळीनिमित्त अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस किंवा काहीतरी भेटवस्तू देत असतात. त्यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा क्षण असतो. पण पंढपूरमध्ये घडलेल्या घटनेने मात्र अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पंढरपुरात नेमकं घडलं काय ?
वारकरी संप्रदायात शाकाहार हा सर्वश्रेष्ठ हार मानला जातो. मांसाहार, मद्यपान अशा गोष्टींना वारकरी सांप्रदाय विठ्ठल भक्तांमध्ये थारा नाही. मात्र पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बीव्हीजी कंपनीकडून चिकन मसाला भेट देण्यात आला आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
विठ्ठल मंदिरामध्ये बीव्हीजी कंपनीकडून आउट सोर्सिंग पद्धतीने सुरक्षारक्षक व इतर कर्मचारी पुरवले जातात. याच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चिकन मसाला देण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सध्या वारकरी संप्रदायातून चिकन मसाल्याच्या भेटवस्तूबाबत संताप व्यक्त केला जात आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने देखील या कंपनीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून कंपनीला नोटीस बजावली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी ही माहिती दिली आहे.
पुढे बोलताना राजेंद्र शेळके म्हणाले की, ‘सदरची घटना लक्षात आल्यानंतर ताबडतोब कंपनीने वाटप थांबवलेलं आहे. कारण मसाले असले तरी त्याच्यावरती जे छायाचित्र आहे ते आक्षेपार्ह आहे. पांडुरंगाच्या या पवित्र भूमीत या मंदिराचा आणि येथील सर्वांनीच या मंदिराचे पावित्र्य जपणं गरजेचं आहे. सदरची बाब मंदिर समितीने गांभीर्याने घेतलेली आहेत सदर कंपनीला कालच मंदिर समितीमार्फत नोटीस दिलेली आहे आणि निश्चितच त्याच्यावरती कारवाई केली जाईल.’