मनमाड (सौ. नैवेद्या बिदरी) :- मोकाट कुत्र्यांपासून वाचण्याच्या नादात विहिरीत पडून 6 हरणांचा मृत्यू झाल्याची घटना नांदगाव तालुक्यात घडली. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने वन्यजीव चारा व पाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे धाव घेत असल्याचे सध्या अनेक ठिकाणी चित्र दिसून येत आहे. नांदगावच्या जळगाव बुद्रुक येथे 10 हरणांचे कळप परिसरातील शेतालगत असलेल्या गवत खात असताना मोकाट कुत्र्यांनी त्यांच्यावर धाव घेतली.
दरम्यान घाबरलेल्या अवस्थेतील हरणांनी उड्या मारत जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असताना जवळच असलेल्या हरिश्चंद्र रामा आहिरे यांच्या शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत एकाच वेळी 10 हरिण पडले. या घटनेमध्ये सहा हरणांचा मृत्यू झाल्याने वन्यप्रेमी हळहळ व्यक्त करीत आहे. तर 4 हरणांना वाचविण्यात वनविभागाला यश आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कासारी तालुका नांदगाव वन हद्दीतील जळगाव बुद्रुक परिसरात हरणांचा एक कळप पाण्याच्या शोधात भटकंती करत होता. त्याचवेळी अचानकपणे मोकाट कुत्र्यांनी या कळपावर हल्ला केला. कुत्र्यांनी केलेल्या या हल्ल्यातून आपला जीव वाचवण्यासाठी हरणांनी तेथून पळ काढला. मात्र तेथील शेतकरी हरिश्चंद्र रामा अहिरे यांच्या शेतातील कठडा नसलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने 10 हरणांचा कळप त्या पाण्यात पडला.
शेतकऱ्याने तत्काळ वनविभागाला याबाबत कळविले. वनरक्षक एम.बी.पाटील व वडगे आदींसह पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र विहिर खोल असल्याने व विहिरीत असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने 10 हरणांपैकी 6 हरणांचा तोपर्यंत पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर 4 हरणांना वाचविण्यात वनविभागाला स्थानिकांच्या मदतीने यश आले.