मनमाड (प्रतिनिधी) :- वन्य जीव गुन्हे नियंत्रण ब्युरो मुंबई (WCCB) यांच्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, शुक्रवारी मनमाड रेल्वे स्थानक परिसरात हरिण या संरक्षित वन्यप्राण्याच्या कातडीची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे वनविभागाने तत्काळ कारवाई करत सापळा रचून चार जणांना हरणाच्या कातडीसह अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तींवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत वन्यप्राण्यांच्या तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक केलेल्या आरोपींची नावे अशी आहेत १. दिपक सुरेश चव्हाण (वय ३९, रा. हेंकलवाडी, ता. व जि. धुळे) २. प्रविण रमेश बनसोड, (रा. वर्धा, ता. व जि. वर्धा), ३. मारुती लक्ष्मण उईके ( रा. ढाकुलगाव, ता. धामणगाव, जि. अमरावती), ४. अभिलाल अर्जुन पाटील, (रा. सडगाव, ता. व जि. धुळे)
ही कारवाई नाशिक पूर्व विभागाचे उपवनसंरक्षक राकेश सेपट आणि वन्यजीव व वनीकरणचे सहाय्यक वनसंरक्षक शिवाजी सहाणे, चांदवड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष कारवाईचे नेतृत्व येवला प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांनी केले.
मनमाडचे वनपाल जयप्रकाश शिरसाठ, वनरक्षक विजय दोंदे, अमोल पाटील, विष्णु राठोड, संजय बेडवाल, विजय टेकनर, संतोष दराडे, पंकज नागपुरे, श्रीमती सोनाली वाघ, श्रीमती वंदना खरात आणि वाहनचालक सुनिल भुरुक यांनी ही धाडसी कारवाई यशस्वी केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून हरणाची कातडी जप्त करण्यात आली असून, ती तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. आरोपींविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येत असून, पुढील तपास सुरु असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांनी पत्रकारांना दिली आहे.
ही कारवाई वन्यप्राण्यांच्या अवैध तस्करीविरोधातील प्रशासनाच्या सतर्कतेमुळे करण्यात आली. वनविभागाकडून अशीच तत्परता आणि कार्यक्षमता भविष्यातही दिसून येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.