'मोंथा' चक्रीवादळाचे संकट ! महाराष्ट्रातील नाशिकसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
'मोंथा' चक्रीवादळाचे संकट ! महाराष्ट्रातील नाशिकसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
img
वैष्णवी सांगळे
आंध्र प्रदेशातील काकीनाडा आणि मछलीपट्टनम या भागातील किनाऱ्यावर मोंथा चक्रीवादळाने धडक दिली आहे. १७ किमी प्रतितास वेगाने हे वादळ पुढे सरकत आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे.बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'मोंथा' चक्रीवादळाने आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ धडक दिल्यानंतर, त्याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर स्पष्टपणे दिसून येत आहे. हे वादळ पूर्व किनाऱ्यावर असले तरी, त्याच्या प्रभावामुळे राज्याच्या पूर्वेकडील भागांत मोठा धोका वाढला आहे. 


एकीकडे विदर्भावर ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे, तर दुसरीकडे अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळत आहेत.भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, 'मोंथा' चक्रीवादळामुळे आणि अरबी समुद्रातील सक्रिय कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आज, २९ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे.


'मोंथा' चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव हा महाराष्ट्राच्या पूर्व भागातील विदर्भावर जाणवत आहे. सोसाट्याच्या वाऱ्याच्या धोक्यासह विदर्भास ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे. 

ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने आज चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. यादरम्यान, गडचिरोली जिल्ह्याच्या आसपासच्या भागांत वाऱ्याचा वेग ताशी ९० ते १०० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.

यलो अलर्ट
नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांतही मध्यम ते जोरदार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता कायम आहे.

मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर पूर्वीपेक्षा कमी असला तरी, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी किंवा विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर अरबी समुद्रात सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील (कोकण) आणि घाटमाथ्याच्या (मध्य महाराष्ट्र) भागांत पाऊस सुरूच आहे.

उत्तर कोकण (मुंबई शहर, उपनगर) आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच, विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. तर पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल.


इतर बातम्या
Join Whatsapp Group