बॉलिवूड इंडस्ट्रीत अशा बऱ्याच अभिनेत्री आल्या, ज्यांनी खूप नाव कमावलं आणि अचानक त्यांनी इंडस्ट्रीला रामराम केला. या यादीत अभिनेत्री ममता कुलकर्णीचंही नाव आहे. करिअरच्या शिखरावर असताना तिने इंडस्ट्री अचानक सोडली होती. तिचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन जोडल्यानंतर स्टारडम हळूहळू कमी होऊ लागलं होतं.
गेल्या काही वर्षांपासून ममता अध्यात्माकडे वळली असून महाकुंभदरम्यान ती भारतात आली होती. आता नुकत्याच एका पत्रकार परिषदेत तिने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल असं वक्तव्य केलंय, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गोरखपूरमध्ये एका पत्रकार परिषदेत ममताने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं नाव घेत तो दहशतवादी नसल्याचं म्हटलं आहे.
ममता कुलकर्णी दाऊदबद्दल म्हणाली...
ममता कुलकर्णीनं कित्येक वर्षांनंतर अंडरवर्ल्डच्या सर्वात मोठ्या डॉनचं नाव घेऊन एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ममता कुलकर्णी माध्यमांशी बोलताना म्हणाली की, "दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही... आणि त्यानं बॉम्बस्फोटही घडवून आणलेले नाहीत... बॉम्बस्फोटासारख्या घटनांमध्ये त्याचं नाव कधीच आलेलं नाही. माध्यमं आणि काही राजकीय शक्ती यांनी कट रचून त्याला बदनाम केलंय... एखादी व्यक्ती गुन्हेगार असण्यासाठी तिच्यावर आरोप सिद्ध होणं गरजेचं असतं, फक्त प्रचार केल्यानं कुणीच गुन्हेगार ठरत नाही..."
तिने पुढे म्हटले, ''दाऊदशी माझा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. माझे नाव एका व्यक्तीसोबत जरूर जोडले गेले होते. पण तुम्ही बघा, त्याने कोणताही बॉम्बस्फोट केला नाही. देशात देशविरोधी काही केले नव्हते. ज्याच्यासोबत माझे नाव जोडले गेले, त्याने कधी बॉम्बस्फोट केला नाही. मी आयुष्यात कधीही दाऊदला भेटले नाही.'