भ्रमर प्रतिनिधी : चेतन बागुल :- बागलाण तालुक्यातील पिंपळदर शिवारात बिबट्याने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला असून गुरुवारी पहाटे भरत शंकर सूर्यवंशी यांच्या शेतातील गाईवर हल्ला केल्याने गाय ठार झाली.यामुळे परिसरात सर्वत्र दहशतीचे वातावरण असून तात्काळ पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी पिंपळदर गावाचे माजी सरपंच संजय पवार व ग्रामस्थांनी केली आहे.
पिंपळदर गावालगत डोंगर रांग असून या परिसरात वनसंपदा ही बऱ्यापैकी टिकून आहे. विशेषत्वाने गुजऱ्याची टेकडी, नवेगाव शिवार आणि मांगबारी परिसरात नेहमीच बिबट्यांचे वास्तव्य राहिले आहे. परंतु अलीकडे हे बिबटे थेट गाव परिसरात दत्तक देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पिंपळदर गावाच्या शिवारात ठीक ठिकाणी बिबट्याने पाळीव कुत्रे ,शेळ्या, मेंढ्या व इतर पाळीव प्राण्यांचा वारंवार बळी घेतल्याच्या घटना घडत आहेत.
मांगबारी घाटात सटाणा कळवण रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या दुचाकी वाहनांवर देखील थेट हल्ला केल्याच्या घटना पुढे आले आहेत. त्यातच गुरुवारी पहाटेच्या सुमारास मांगबारी शिवारातील शेतात भरत शंकर सूर्यवंशी यांची गाभण असलेली गाय बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाली. यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. गाव परिसरात तीन ते चार बिबटे एकत्रित फिरताना दिसले असून सर्वत्र दहशत पसरली आहे.
बिबट्याने जर नागरिकांवर हल्ला केला तर याला जबाबदार कोण राहील असा प्रश्न नागरिक करत आहेत त्यामुळे या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावून वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त लावावा अशी मागणी पिंपळदर व परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.