दैनिक भ्रमर : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. अशातच नाशिकच्या बागलाण येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील माजी सरपंचावर क्षुल्लक वादातून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात माजी सरपंच गंभीर जखमी झाले आहे.
मुन्ना सूर्यवंशी असे हल्ला झालेल्या माजी सरपंचाचे नाव आहे. ते नाशिकच्या बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील रस्त्याच्या कामासाठी लोकसहभागातून मुरूम टाकण्यात येत होता. मुरूम वाहतूक सुरू असताना, 'आम्हाला का विचारले नाही?' या कारणावरून वाद झाला.
या वादातून संतप्त झालेल्या एका व्यक्तीनं माजी सरपंच सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सूर्यवंशी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सटाणा ग्रामीम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी त्यांना नाशिकमध्ये रवाना करण्यात आले आहे.