नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- पिंपळगाव बसवंत येथून नाशिक येथे आलेल्या डाळिंब व्यापार्याला चालत्या रिक्षातून ढकलून देऊन त्याच्याजवळ असलेल्या पिशवीतील पाच लाख रुपये बळजबरीने हिसकावून घेणारा संशयित आरोपी गौरव जालिंदर केलकर यास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून साडेचार लाखांची रोकड हस्तगत केली आहे. दरम्यान, या आरोपीस न्यायालयात हजर केले असता दि. 6 डिसेंबरपर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी दिली आहे.
याबाबत माहिती अशी, की दि. 1 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पिंपळगाव बसवंत येथून व्यापार्यांचे पैसे देण्यासाठी प्रवीणभाई माणिकलाल दवे (वय 65) हे नाशिकला आले होते. आडगाव नाका येथे उतरून एका रिक्षाला हात देऊन पेठ फाटा येथे जायचे असल्याचे सांगितले. यावेळी रिक्षात अगोदरच दोन इसम बसलेले होते. रिक्षा पंचमुखी हनुमान मंदिर रोडवर येताच रिक्षाचालकासह अन्य दोघांनी त्यांना मारहाण केली व त्यांच्याकडून पाच लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून घेतली व त्यांना रिक्षातून खाली ढकलून पसार झाले.
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मेमाणे व गुन्हे शोध पथकास मार्गदर्शन करून आरोपीचा शोध घेण्यास सांगितले. या पथकाने पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील सीसीटीव्हींच्या फुटेजची तपासणी केली असता रिक्षा क्रमांक एमएच 15 एफयू 3180 असा क्रमांक समजला. त्याचा मालक मोहिद्दीन दादामियाँ शेख (रा. रामोशी वाडा, वडाळा गाव) याची चौकशी केली असता त्यांनी ही रिक्षा सुमारे दोन वर्षांपासून गौरव जालिंदर केलकर यास चालविण्यास दिलेली असून, तोच रिक्षा वापरतो, असे सांगितले. त्यावरून गौरवचा शोध घेऊन त्यास रिक्षासह ताब्यात घेतले.
यावेळी गौरवने घरातच ठेवलेली साडेचार लाख रुपयांची रोकड पोलिसांना काढून दिली, तसेच या लूट प्रकरणात किशोर बाबूराव वाकोडे (रा. कोळीवाडा, अमरधाम रोड, जुने नाशिक) याचाही सहभाग असून, अन्य एका साथीदाराचे नाव व पत्ता माहीत नाहीत, असे सांगितले.
डाळिंब व्यापार्याच्या लुटीचा यशस्वी तपास केल्याबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, सुनील पवार आदींनी गुन्हे शोध पथकाचे स. पो. नि. शरद पाटील, उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे, हवालदार महेश नांदुर्डीकर, संतोष पवार, पोलीस नाईक लोणारे, कॉन्स्टेबल अंकुश काळे, नितीन पवार, अमोल देशमुख, वैभव परदेशी, सचिन बहीकर, विनोद चितळकर, योगेश शिंदे, युवराज गायकवाड, कैलास वाघचौरे, महिला कॉन्स्टेबल रोहिणी भोईर आदींचे अभिनंदन केले आहे.