नाशिक महापालिका मतदार यादीवर तक्रारींचा पाऊस , 7,347 हरकतींची प्रशासनाकडे झाली नोंद
नाशिक महापालिका मतदार यादीवर तक्रारींचा पाऊस , 7,347 हरकतींची प्रशासनाकडे झाली नोंद
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक महानगरपालिका प्रशासनाकडे प्रभागनिहाय मतदार याद्यांवर तक्रारींचा पाऊस सुरुच असून काल तब्बल 1,232 तक्रारी प्राप्त झाल्या. दरम्यान 20 नोव्हेंबर ते कालपर्यर्ंत 7,347 हरकतींची नोंद प्रशासनाकडे झाली आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून मतदार यादीवर भाजप वगळता सर्वपक्षीयांकडून आक्षेप घेतले जात आहेत. मागील बारा दिवसांत सात हजार हरकती प्रशासनाकडे आल्या आहेत. आलेल्या हकरतींची दखल घेऊन त्यावर पालिका प्रशासनाकडून काम सुरु आहे.

हरकत घेण्यासाठी आज (दि.3) अंतिम मुदत असल्याने अखेरच्या दिवशी तक्रारींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेच्या 31 प्रभागांतील मतदार यादी जाहीर झाली आहे. मात्र अनेक प्रभागातील मतदारांचे नाव दुरुस्ती, पत्ता बदल, नवीन नोंदणी अशा विविध तक्रारींचा समावेश आहे. महानगरपालिकेने प्राप्त हरकतींची तपासणी करण्यासाठी विशेष पथके तयार केली असून, संबंधित त्वरित पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी दाखल केलेल्या हरकतींचे योग्य निरसन व्हावे, यासाठी प्रत्यक्ष स्थळ पडताळणी, घरभेट तसेच आवश्यक कागदपत्रांची तपासणी अशा पद्धतीने प्रक्रिया राबवली जाणार आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदारयादीवर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होत आहे.

नाशिकरोड, नाशिक पूर्व, सातपूर, नवीन नाशिक, पंचवटी, नाशिक पश्‍चिम या सहाही विभागातून हरकती येत आहेत. साडेतीन वर्षांनंतर नाशिक महापालिकेची निवडणूक होत असून सर्वपक्षीय त्यासाठी तयारीला लागले आहेत. परंतु अनेक मतदार दुसर्‍या प्रभागात गेल्याने इच्छुकांना धक्का बसला आहे.

सहा विभागांतील तक्रारींमध्ये नवीन नाशिकमधून सर्वाधिक 5,363 हरकती आल्या आहेत. त्याखालोखाल नाशिकरोड विभागातून 1,043 तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. तर महापालिकेने 20 नोव्हेंबर रोजी मतदारयादी प्रसिद्ध केली. त्यानंतर विविध ठिकाणाहून त्यावर हरकती घेतल्या जाऊ लागल्या. दरम्यान मतदारयादी प्रसिद्ध झाल्यापासूनच्या पंधरा दिवसांत काल सर्वाधिक 1,232 तक्रारी दाखल झाल्या आहे.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group