नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. शहरातील मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेला ट्रिपल तलाक देण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या विवाहेतीला कुरियरने ‘ट्रीपल तलाक' देण्यात आला आहे.
विवाहितेला तिच्या पतीने थेट बिहार आणि कॅनडामधून 'ट्रीपल तलाक'चे स्वहस्ताक्षरातील लेखी कागद कुरियरद्वारे पाठविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन तिच्या पतीसह सासु, सासऱ्याविरुद्ध मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शादी डॉट कॉम वरून ओळख झाल्यानंतर २४ जानेवारी २०२२ ला विवाहितेचा मुस्लिम पद्धतीनुसार संशयित आरोपीसोबत निकाह ( विवाह ) झाला होता तेव्हापासून आजपर्यंत पीडितेचा पतीसह तिचे सासू-सासरे यांनी बिहार व कॅनडामध्ये शारिरिक-मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
नवा व्यवसाय सुरू करण्याकरिता माहेरच्यांकडून विवाहितेने पैसे आणून दिले नाही, म्हणून सासु-सासऱ्यांसह पतीने शिवीगाळ व मारहाण करत छळ केला. तसेच लग्नात मिळालेले आठ तोळ्यांचे दागिनेदेखील बळजबरीने अंगावरुन काढून घेत हाकलून दिले. त्यानंतर पतीने लेखी स्वरुपात स्वतःच्या हस्ताक्षरात स्वाक्षरीसह ट्रीपल तलाकचे पत्र कुरियरद्वारे पत्र पाठविले.
त्यानंतर पीडित महिलेने महिला सुरक्षा शाखेकडेही अर्ज केला होता. त्यानंतर मुंबईनाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी संशयितांविरुद्ध मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण कायद्यांतर्गत कलम ४ आणि भारतीय न्यायसंहिता कलम ८५ नुसार विवाहितेला कुरपणे वागविणे, तिचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.