निफाड प्रतिनिधी : शेखर देसाई : - नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर चिंतेचा विषय ठरत असताना, देवगाव परिसरातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देवगाव येथे अवघ्या महिनाभरात तिसरा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
सततच्या बिबट्यांच्या उपस्थितीमुळे भयभीत झालेल्या परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी या घटनेमुळे सुटकेचा निःश्वास सोडला आहे. देवगाव येथील पोलीस पाटील सुनील बोचरे यांच्या गट नंबर ४१४ मधील शेतात वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. बुधवारी (दि. ४) सकाळी या पिंजऱ्यात बिबट्या अडकला.
हा बिबट्या नर जातीचा असून, त्याचे अंदाजित वय ५ वर्षे आहे. याआधीही देवगाव परिसरात काही दिवसांपूर्वीच बिबटे जेरबंद झाले होते. महिनाभरात तिसरा बिबट्या पकडल्याने या भागात बिबट्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले असल्याचे स्पष्ट होत आहे.
बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आले असून, त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर, त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याची कार्यवाही वन विभागाकडून केली जात आहे.
सततच्या बिबट्यांच्या उपद्रवामुळे शेतीची कामे करताना नागरिकांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तिसरा बिबट्या जेरबंद झाल्यामुळे या भागातील नागरिकांना आता काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.