नाशिक जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांसाठी आज मतदान, नगराध्यक्षपदासाठी 61 तर नगरसेवकांकरिता 1028 उमेदवार रिंगणात
नाशिक जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांसाठी आज मतदान, नगराध्यक्षपदासाठी 61 तर नगरसेवकांकरिता 1028 उमेदवार रिंगणात
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांमधील नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडीसाठी आज मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी  प्रशासकीय तयारी पूर्ण  झाली असून अधिकारी व कर्मचारी काल सायंकाळीच संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना झाले. नगरसेवक पदासाठी 1028 तर नगराध्यक्ष-पदासाठी 61 उमेदवार निवडणूक आखाड्यात  आहेत.

उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त होणार असून उद्या (दि.3) होणार्‍या मतमोजणीची तयारीही पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यातील 3 लाख 72 हजार 543 मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी उपलब्ध आहे.

जिल्ह्यातील  इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, सिन्नर, भगूर, ओझर, पिंपळगाव बसवंत, चांदवड, सटाणा, मनमाड, नांदगाव आणि येवला या 11 नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आठवडाभरापासून सुरू असलेला प्रचार थंडावला असून प्रचाराचा धुरळाही खाली बसला आहे.

सिन्नर, ओझर, चांदवड मतदारसंघातील एकूण सात प्रभागांतील निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने रविवारी स्थगित केली असून या प्रभागांत आता 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, उर्वरित 11 नगरपरिषदांमधील 416 मतदान केंद्रांवर आज मतदान घेण्यात येत असून ईव्हीएम मशीनची केंद्रांवर पोहोचल्याने मतदान प्रारंभ झाला आहे.

 मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अडीच हजार अधिकारी व कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे. हे अधिकारी व कर्मचारी काल 150 वाहनांद्वारे कर्तव्यस्थळी दाखल झाले. आज सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल.

जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागाचे सहआयुक्त शाम गोसावी यांनी केले आहे.  जिल्ह्यात एकही मतदान केंद्र संवेदनशील नसल्याचे प्रशासनाने सांगितले असले तरी मतदान व मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात ,
1,87,906 -  पुरुष मतदार,  
1,84,619 - महिला मतदार
 18  - तृतीयपंथीय मतदार

मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाइल वापरण्यास बंदी
 2500 कर्मचारी, 150 वाहन व्यवस्था
1 मतदान केंद्रवार 5 अधिकारी (कर्मचारी)

Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group