नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर चार वर्षे लैंगिक अत्याचार करून तिला लग्नास नकार देत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रियकरासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी तरुणीला आरोपीने खोट्या प्रेमात अडकवून लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तरुणीसोबत वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध राणेनगर येथील सेव्हन अॅपल हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तरुणीने लग्नाबाबत विचारले असता आरोपी प्रियकर अदनान खाटीक (रा. सादिकनगर, वडाळा गाव) याने लग्नास नकार दिला.
त्यानंतर पीडितेने आरोपीच्या राहत्या घरी जाऊन लग्नाबाबत जाब विचारला असता प्रियकराचे वडील, त्याचा भाऊ परवेज खाटीक व मित्र तौसिफ पिंजारी (सर्व रा. सादिकनगर, वडाळा गाव, नाशिक) यांनी पीडितेला जातिवाचक शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली, तसेच तौसिफ पिंजारी याने पीडितेचे अश्लील फोटो आरोपीकडून मागवून तिला धमकी दिली. हा प्रकार सन 2021 ते दि. 9 नोव्हेंबर 2025 या कालावधीत घडला.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अदनान खाटीक, परवेज खाटीक, त्यांचे वडील व तौसिफ पिंजारी यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त बारी करीत आहेत.