नाशिकमध्ये एक धक्कादायक आणि गुढ वाढवणारी घटना समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव येथील बरड्याची वाडी वावीहर्ष पाड्यावर राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेने तब्बल १४ मुलं मुलींना जन्म दिला. या १४ मुला मुलींपैकी सहा मुलं आणि मुली विकल्याचा संशय स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याने उपस्थित करण्यात आल्याने पैशांसाठी पोटच्या मुलाला विकल्याचा संशय व्यक्त झाल्याने यंत्रणादेखील खडबडून जागी झाली.
त्र्यंबकेश्वर येथील टाके देवगाव या आदिवासीबहुल पाड्यावर वावी हर्ष येथे आशा सेविकेच्या मदतीने हा धक्कादायक प्रकार समोर आला. बच्चुबाई हंडोगे या ४५ वर्षीय महिलेला तब्बल १४ मुलं आणि मुली झाल्या. यापैकी सहा हून जास्त मुला मुलींची पैशासाठी विक्री झाल्याचा संशय स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला. १० ऑक्टोंबर 2025 रोजी या महिलेला एक पुरुष लिंगाचे अपत्य झाले आणि या अपत्याचा वजन कमी असल्याने आरोग्य विभागाकडून या नवजात बाळाचे आरोग्याची तपासणी आशा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या महिलेच्या घरी सुरू होती.
मात्र या महिलेला मुलाचे संगोपन होत नसल्याने ते मूल तिने विकल्याची माहिती आशा सेविकेसह स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली. ज्यावेळी या मुलाची आरोग्य तपासणी करण्यासाठी स्थानिक अशा सेविका नेहमीप्रमाणे गेली त्यावेळी तिला या महिलेने तिचे नवजात बाळ विकल्याचा संशय आला आणि या आधीचे देखील दोन ते तीन लहान मुलं आणि मुली विकल्याची माहिती मिळाली.
मात्र पैशासाठी नाही तर हालकीचे जीवन जगत असताना बाळाचे आजारपण आणि त्याला दूध मिळत नसल्याने हे बाळ आम्ही नातेवाईकांना दिले. दत्तक म्हणून हे बाळ आम्ही दिले या आधी देखील आमच्या नातेवाईकांमध्ये बाळ सांभाळण्यासाठी दिल्याचा खुलासा बच्चुबाई हंडोगे आणि विष्णू हंडोगे या दांपत्याने केला.
गरोदरपणात कोणतीही आवश्यक घ्यावयाची काळजी आरोग्य विभागाने घेतली नाही. अंगणवाडीतून गरोदरपणात आणि बाळ झाल्यानंतर मिळणारी मदत मिळाली नाही, त्यामुळे बाळाला पोषक दूध देऊ न शकल्याने हे दीड महिन्याचे बाळ नातेवाईकांना दत्तक सांभाळण्यासाठी दिल्याचं सांगितले. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडून समिती देखील गठीत करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
आता या समितीच्या चौकशीत आणि पोलीस तपासात नेमकं काय समोर येत आहे, हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे.