नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- रिक्षा प्रवासात डाळिंब व्यापार्याच्या डोक्याला काही तरी वस्तू लावून जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील 5 लाख रुपयांची रोकड असलेली थैली बळजबरीने हिसकावून नेणार्या दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी प्रवीणभाई माणिकलाल दवे (रा. मोरेनगर, पिंपळगाव बसवंत) हे डाळिंबाचे व्यापारी आहेत. दवे हे काल सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास रिक्षाने प्रवास करत होते. ही रिक्षा जुना आडगाव नाका येथील पंचमुखी हनुमान मंदिराच्या पुढे आली असता रिक्षात त्यांच्या शेजारी बसलेल्या दोन अनोळखी इसमांनी दवे यांच्या डोक्याला काही तरी वस्तू लावून त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
तसेच दवे यांना शिवीगाळ करुन आरोपींनी त्यांच्या हातातील वस्तूने दवे यांच्या बरगड्यांमध्ये मारुन दवे यांच्याजवळ 5 लाख रुपयांची रोकड असलेली कापडाची पिशवी बळजबरीने हिसकावून दवे यांना चालत्या रिक्षातून ढकलून दिले.
याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुद्ध विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नेमाणे करीत आहे