नाशिककरांनो तुम्ही जर घर घेण्याचा विचार करत असाल तर आता तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नाशिकमधील प्राईम लोकेशनवरील फ्लॅटची म्हाडाकडून लॉटरी काढण्यात आली आहे. म्हाडाकडून नाशिकमध्ये तब्बल ४०२ घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. घराची किंमत १४ लाखांपासून सुरू होत आहे.
यासाठी निवासी सदनिका आगाऊ अंशदान तत्वावर विक्रीसाठी आयोजित सोडतीसाठी म्हाडाकडून ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृतीला सोमवारी सुरूवात करण्यात आली नाशिकमधील प्राईम लोकेशनवरील फ्लॅटची म्हाडाकडून लॉटरी काढण्यात आली आहे.
नाशिकमधील चुंचाळे, पाथर्डी, मखमलाबाद, आडगाव, सातपूर या प्राईम लोकेशनच्या ठिकाणी असणाऱ्या ४०२ घरांसाठी लॉटरी काढण्यात आल्या. गो लाईव्ह कार्यक्रमाअंतर्गत 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते नाशिकमधील लॉटरीचा प्रारंभ करण्यात आला.
इच्छुक अर्जदारांनी https://housing.mhada.gov.in अथवा https://mhada.gov.in या संकेतस्थळावर स्वप्नातील घरासाठी ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
नाशिक मंडळाने जाहीर केलेल्या सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी चुंचाळे शिवारात १३८ घरे, पाथर्डी शिवारात ३०, मखमलाबाद शिवारात ४८ सदनिका, आडगाव शिवारातील ३३ अशा एकूण 293 घरांच्या सोडतीचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी सातपूर शिवारात ४० सदनिका, पाथर्डी शिवारात ३५, आडगाव शिवारात ३४ अशा एकूण १०९ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. १४,९४,००० ते ३६,७५ ०० यादरम्यान घरांच्या किंमती आहेत.
घरासाठी अर्ज करताना अर्जदारास उत्पन्नाचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. अर्जदाराचे आयकर विवरणपत्र अथवा तहसील कार्यालयाचे उत्पन्न प्रमाणपत्र यातील एक उत्पन्न पुरावा ग्राह्य धरले जाईल. १ डिसेंबरपासून नाशिकमधील म्हाडाच्या घरासाठी अर्ज करता येणार आहे. २३ डिसेंबर रात्री ११.५९ पर्यंत अर्ज करण्याची मुदत असेल.
२४ डिसेंबरपर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरता येईल. ३० डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या काळात यादी प्रसिद्धीनंतर ऑनलाइन आक्षेप/ दावे-हरकती दाखल करता येणार आहे. ६ जानेवारी २०२६ रोजी अंतिम यादीची प्रसिद्धी केली जाणार आहे.सोडतीची तारीख, वेळ आणि ठिकाण स्वतंत्रपणे ऑनलाइन जाहीर केले जाईल.