तपोवनातील वृक्षतोडीबाबत देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक वक्तव्य, म्हणाले,  गुगल इमेज...
तपोवनातील वृक्षतोडीबाबत देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक वक्तव्य, म्हणाले, गुगल इमेज...
img
वैष्णवी सांगळे
कुंभमेळ्यासाठी तपोवनातील झाडांची कत्तल करण्यावरुन सध्या नाशिकमध्ये राजकारण आणि समाजकारण चांगलेच तापले आहे. ही झाडे वाचवण्यासाठी नाशिककरांनी आक्रमक पवित्र घेतला असताना अनेक कलाकारांनीही वृक्षतोड होऊ नये अशी मागणी केली आहे.  तपोवनातील झाडांची कत्तल न करता राज्य सरकारने साधुग्रामी उभारणी करावी, अशी मागणी केली जात आहे.

यासंदर्भात बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केले. या विषयावर राजकारण करणे योग्य नाही. कुंभमेळा ही आपली प्राचीन, सनातन परंपरा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

तपोवनासंदर्भात आमचं मत हे की, झाडं कापणं योग्य नाही. कमीतकमी झाडं कापायला पाहिजेत. पण आपल्याला वास्तवही लक्षात घ्यावं लागेल. महानगरपालिकने हा निर्णय का घेतला, याचा विचार करावा. प्रयागराज येथे जो कुंभमेळा झाला तो 15 हजार हेक्टर जागेवर झाला. नाशिकमध्ये साधुग्रामची  350 एकर जागा आहे. नाशिक शहरात रामबन आणि साधुग्रामच्या बाजूला दुसरी कोणतीही जागा नाही. झाडांच्या दाटीमुळे आता सध्याच्या ठिकाणी साधुग्राम तयार करणे शक्य नाही.

याशिवाय, 2015-16 मधील गुगल इमेज बघितल्या तर त्यामध्ये याठिकाणी एकही झाड दिसणार नाही. त्यावेळी राज्य सरकारने 50 कोटी वृक्षरोपणाचा जो कार्यक्रम हाती घेतला होता, त्या अंतर्गत महानगरपालिकेने ही झाडे लावली होती. पण इतक्या मोठ्याप्रमाणावर झाडे कापणे योग्य नाही. आम्ही यासंदर्भात विचार करत आहोत. काही मोठी झाडं काढून आम्ही रिलोकेट करणार आहोत. पण या विषयावर राजकारण होणे चूक आहे.

कुंभमेळा  ही आपली प्राचीन आणि सनातन परंपरा आहे. कुंभमेळा हा आपला पर्यावरणाशी असलेला संबंध दृढ करणारा आहे. या कुंभमेळ्यासाठी आपण क्लीन गोदावरी ही मोहीम हाती घेणार आहोत. त्यामुळे तपोवनात विनाकारण वृक्षतोड होणार नाही.  आवश्यक ती झाडं कापली जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group