नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सबकॉन्ट्रॅक्टर म्हणून दिलेले काम पूर्ण करून देखील ठरलेल्या रकमेपैकी काही पैसे अदा करून एका कॉन्ट्रॅक्टरची 49 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना मुंबई नाका परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी राजकुमार महंग्या पावरा (वय 45, रा. शिरपूर, जि. धुळे) हे कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम पाहतात. दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी पावरा हे मुंबई नाक्यावरील श्री कंबाईन्स प्रा. लि. या कंपनीचे संचालक दिनेश ब्राह्मणकर, संदीप ब्राह्मणकर व प्रशांत बाळकृष्ण कुंभारे यांना ओएफसीच्या कामासंदर्भात भेटले होते. पावरा यांना कंपनीने सबकॉन्ट्रॅक्टर म्हणून काम दिले होते. या कामाचे एकूण बिल 78 लाख 93 हजार 600 रुपये झाले होते. त्यापैकी कंपनीने पावरा यांना 29 लाख 50 हजार रुपये अदा केले होते.
उर्वरित रक्कम घेण्यासाठी फेब्रुवारी 2025 मध्ये पावरा हे दिनेश ब्राह्मणकर याच्या कार्यालयात गेले असता दिनेश ब्राह्मणकरने पावरा यांना जातिवाचक शिवीगाळ करीत त्यांना अपमानित केले. नंतर ब्राह्मणकरने “तुला कुठे जायचे, त्यांच्याकडे जा. मी कोणाला घाबरत नाही, तुझे हातपाय तोडावे लागतील,” अशी धमकी देऊन पावरा यांना मारहाण करून ऑफिसबाहेर हाकलून दिले.
आपली फसवणूक झाल्याचे समजताच पावरा यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फिर्याद दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरवाडकर करीत आहेत.