नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) :- गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून एका फायनान्स कंपनीच्या तेरा जणांनी एका तरुणास 44 लाख रुपयांचा गंडा घालून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी प्रेम विठ्ठल कुंभार (वय 33, रा. रामकृष्णनगर, रामेश्वर अपार्टमेंट, एक्स्लो पॉईंटजवळ, अंबड) यांना आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे (रा. शिवरंजनी अपार्टमेंट, खुटवडनगर, नाशिक) व पूजा गोकुळ पोटिंदे ऊर्फ पूजा भूपेंद्र साळवे (रा. एकतानगर, बोरगड) यांनी आपसात फौजदारी पात्र संगनमत करून खुटवडनगर येथे शिवरंजनी अपार्टमेंटमध्ये असलेल्या ग्रो मोअर फायनान्स सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीच्या कार्यालयात बोलावले. त्यानंतर त्यांना गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा देणार असल्याचे प्रलोभन दाखविण्यात आले, तसेच इतर गुंतवणूकदारांचे एक्सेल शिट दाखवून फिर्यादी कुंभार यांना विश्वासात घेऊन वेगवेगळे गुंतवणूक प्लॅन दाखवून नोटरी तयार करून देणार असल्याचे सांगितले.
त्यानुसार भूपेंद्र सावळे व पूजा पोटिंदे यांनी फिर्यादीकडून एकूण 44 लाख रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक स्वीकारली. त्यानंतर कुंभार यांना सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात परतावा देण्यात आला, तसेच पुढील रकमेचे सिक्युरिटी चेक्स देऊन दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नोटरी वगैरे बनवून दिली नाही, तसेच ठरल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात परतावा देण्यात कसूर केली.
फिर्यादींनी गुंतवणूक केलेली रक्कम आरोपींनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरून फसवणूक केली. ही बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादी कुंभार यांनी आरोपी भूपेंद्र सावळे व पूजा पोटिंदे यांच्यासह ग्रो मोअर फायनान्स सर्व्हिस प्रा. लि. चे राजाराम भटू सावळे (रा. शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर), योगेश गोकुळ पोटिंदे (रा. एकतानगर, बोरगड, म्हसरूळ, नाशिक), अरुण रामदास नंदन (रा. खुटवडनगर, सिडको, नाशिक), सीमा अरुण नंदन, तन्मय अरुण नंदन (दोघेही रा. खुटवडनगर, सिडको), ओम् संजय चव्हाण (रा. जेलरोड, नाशिकरोड, सुबोध सुखदेव पाटील ऊर्फ सावळे (रा. नाशिक), संदीप भास्कर सावळे (रा. शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर), चेतन सोनवणे (रा. नाशिक), सतीश पांडुरंग क्षीरसागर-पाटील (रा. मु. पो. ता. धुळे) व शरद पंडित क्षीरसागर (रा. नाशिक) या तेरा जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे.
हा प्रकार दि. 8 मार्च 2024 ते दि. 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत खुटवडनगर येथे घडला. हा गुन्हा पोलीस उपायुक्त यांची परवानगी घेऊन अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक खैरनार करीत आहेत.