अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या खासगी आयुष्यावरून कायम चर्चेत असते. अर्जुन कपूरसोबत रिलेशनसोबत आल्यानंतर ती जास्त चर्चेत आली. त्यात अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायकाचं नाव सतत कोणा ना कोणाशी जोडलं जातंय.
यादरम्यान तिचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय ज्यात ती एका तरुणासोबत दिसतेय. या व्हिडीओवरही नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकाने या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे.
मुलाखतीत मलायका म्हणाली, “मी माझ्या सत्यावर लक्ष केंद्रीत करायला शिकले आहे. त्यामुळे नकारात्मकतेला मी माझ्यावर परिणाम करू देत नाही. ट्रोल्स तर नेहमी ट्रोल्सच राहणार. पण मी स्वत:ला त्या विषारीपणात सामील करू शकत नाही. माझ्यासाठी माझं कुटुंब, मित्रमैत्रिणी आणि शांत मन अधिक महत्त्वाचं आहे.” यावेळी मलायका तिच्या करिअरबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाली. अभिनयातून नाही तर डान्स परफॉर्मन्समधून कामाचं अधिक समाधान मिळाल्याचं तिने सांगितलं.“हे खरंय की अभिनयाने मला कधीच ते समाधान दिलं नाही, जे मला डान्स नंबर परफॉर्म करून मिळालं.
डान्सवर माझं वेगळंच प्रेम आहे. मला माहितीये की आयटम नंबरचा लेबल खूपच मर्यादित वाटतो. पण आज मी अनेक कलाकारांना हे एक आव्हान म्हणून स्वीकारताना पाहते. अशा गाण्यांना बनवायला जी मेहनत लागते, ते पाहून मला त्याचा अधिक आदर वाटू लागला आहे”, असं ती पुढे म्हणाली. ‘छैय्या छैय्या’, ‘माही वे’, ‘होठ रसिलें’, ‘मुन्नी बदनाम हुईं’, ‘अनारकली डिस्को चली’ यांसारखे तिचे आयटम साँग्स चांगलेच गाजले आहेत.