मुंबई : बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी इमारतीवरून उडी मरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अनिल अरोरा यांचे पार्थिव वांद्रे येथील डॉ. भाभा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे.
मुंबईतील वांद्रे येथील अल्मेडा पार्क या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आत्महत्येमागील ठोस कारण समोर आले नाही. मागील वर्षी अनिल अरोरा यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये काम केले होते. अनिल अरोरा यांनी मल्याळी ख्रिश्चन कुटुंबातील जॉयस पॉलीकार्पशी लग्न केले. मलायका 11 वर्षांची असताना अनिल अरोरा आणि जॉयस यांचा घटस्फोट झाला होता. अभिनेत्री मलायका कामानिमित्ताने पुण्यात होती. या घटनेची माहिती मिळताच मलायका तातडीने मुंबईसाठी रवाना झाली.