टीव्ही विश्वावर शोककळा ! मालिकांमधली लाडकी आजी, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड
टीव्ही विश्वावर शोककळा ! मालिकांमधली लाडकी आजी, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड
img
वैष्णवी सांगळे
'इश्कबाज' आणि 'क्वीन' सिनेमांमधल्या  आपल्या धमाकेदार भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिग्गज अभिनेत्री नवनींद्र बहल यांनी वयाच्या 76व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नवनींद्र बहल यांनी केवळ 3 वर्षांची असताना रंगमंचावर अभिनय करायला सुरुवात केली होती. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांचा मुलगा आणि सिनेनिर्माते कानू बहल यांनी दुजोरा दिला आहे. 

अभिनेत्री नवनींद्र बहल यांनी अनेक चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले होते. त्यांचा मुलगा आणि चित्रपट निर्माते कानू बहल यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे ही बातमी सर्वांपर्यंत पोहोचवली; तसेच आपल्या आईवरील प्रेम व्यक्त करत तिच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. निर्मात्याच्या या पोस्टवर अनुराग कश्यप अन् इतरही अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

इन्स्टाग्रामवर आपल्या आईचा अभिनेत्री नवनींद्र बहलचा एक जुना फोटो शेअर करत कानू बहल यांनी लिहिले: "माझी आधारस्तंभ, माझा विश्वास, माझे प्रेम, माझी मार्गदर्शक, माझी गुरु, माझे हृदय.... आई तुला निरोप... जोपर्यंत तू मला पुन्हा जन्म देत नाहीस, तोपर्यंत... तुझे ते हास्य, ते प्रेमळ हसणे आणि तुझे ते कुतूहलाने भरलेले डोळे या सगळ्या आठवणी मी सदैव जपून ठेवेन. माझ्या आत्म्याला प्रकाशमान केल्याबद्दल तुझे आभार."

नवनींद्र बहल यांचे चित्रपट आणि टीव्ही मालिका
नवनींद्र बहल यांनी गुलजार यांचा माचिस, दिबाकर बॅनर्जी यांचा ओये लकी! लकी ओये! आणि कंगना रणौतचा क्वीन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी द प्राइड आणि द गुरू यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्येही काम केले आहे. टीव्ही मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. त्यांनी इश्कबाझ आणि दिल बोले ओबेरॉय या मालिकांमध्ये आजीची भूमिका साकारली, तसेच विजी आणि सदा-ए-वादी या मालिकांमध्येही अभिनय केला.


इतर बातम्या
Join Whatsapp Group