आज शिवजयंतीनिमित्त अभिनेता रितेश देशमुखआणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी त्यांच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाची घोषणा केली आहे. रितेश आणि जिनिलिया यांनी या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. 'राजा शिवाजी' या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेशनं केलं आहे तर या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि जिनिलिया यांनी केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडणार आहे.
मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखला नुकताच 'महाराष्ट्राचा फेव्हरेट डायरेक्टर' हा पुरस्कार मिळाला. वेड चित्रपटाच्या उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी त्याला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचा हा चित्रपट खूपच सुपरहिट ठरला आणि या चित्रपटाने बक्कळ कमाई देखील केली. अशातच आता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुखने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मुहूर्तावर रितेश देशमुखने 'राजा शिवाजी' या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करत माहिती दिली. रितेश देशमुख या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच चित्रपटामध्ये काम देखील करणार असल्याचे बोलले जात आहे. रितेश देशमुखचा हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटातील संगीताची जबाबदारी अजय-अतुल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांनी या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटाचे छायांकन संतोष सिवल हे करणार आहेत. तसेच हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.
रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत याबाबत माहिती दिली. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'इतिहासाच्या गर्भात, एक अशी आकृती जन्माला आली जीचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होतं. एक प्रतिमा, एक आख्यायिका, जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड होतं. छत्रपती शिवाजी महाराज.. फक्त इतिहासपुरुष नाहीत. ती एक भावना आहे, असामान्य शौर्याचा पोवाडा आहे, साडे तिनशे वर्षांपासून.. प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे.'
रितेश देशमुखने या पोस्टमध्ये पुढे असे लिहिले की, शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती. एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्याने एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला. एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सिमा नाही. ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं …आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्यांचं नाव आहे….'राजा शिवाजी’' रितेश देशमुखच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांकडून पसंती मिळत असून ते त्याला नव्या चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत.