दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी BMC नं घेतला मोठा निर्णय: दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांनी 80-90 चं दशक गाजवलं असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या 'हिम्मतवाला', 'मवाली' ते ‘लाडला’, ‘लम्हे’, ‘चालबाज’, ‘चांदनी’, ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटांनी प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. आजही श्रीदेवी यांची लोकप्रियता तितकीच आहे. 24 फेब्रुवारी 2018 मध्ये त्यांचे दुबईत निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देशावर शोककळा पसरली होती. श्रीदेवी यांच्या पश्चात त्यांच्या दोन्ही मुली आता बॉलीवूडमध्ये सक्रिय झाल्या आहेत.
दरम्यान श्रीदेवी यांच्या स्मरणार्थ बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या एका विशिष्ट जंक्शनला श्रीदेवी यांचं नाव दिलं जाणार आहे. दिवंगत अभिनेत्रीला श्रद्धांजली म्हणून महापालिकेने लोखंडवाला कॉम्प्लेक्सजवळच्या एका जंक्शनला ‘श्रीदेवी कपूर चौक’ असं नाव देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
लोखंडवाला परिसरातील ग्रीन एकर्स टॉवर येथे त्यांचं वास्तव्य होतं. तसेच त्यांची अंत्ययात्रा याच पुरुषोतम टंडन रोड परिसरातून निघाली होती. त्यामुळे या जंक्शनला ‘श्रीदेवी कपूर चौक’ असं नाव देण्याची मागणी रहिवासी आणि पालिकेकडून करण्यात आली होती.