बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत आता खासदार झाल्या आहेत. हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून त्यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या. चित्रपटांनंतर आता राजकारणात इनिंग सुरू करणाऱ्या कंगना यांनी या दोन्हीपैकी कोणती गोष्ट अवघड आहे, ते सांगितलं आहे. तसेच यापूर्वीही आपल्याला राजकारणात येण्याच्या ऑफर आल्या होत्या, असा खुलासा केला.
‘हिमाचल पॉडकास्ट’मध्ये बोलताना कंगना यांनी बऱ्याच गोष्टींवर भाष्य केलं. यापूर्वीही राजकारणात येण्यासाठी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील अनेकांशी संपर्क साधण्यात आला होता, असं त्यांनी सांगितलं.
“राजकारणात येण्यासाठी माझ्याशी संपर्क साधण्याची ही पहिलीच वेळ नाही, मला याआधीही अनेक ऑफर मिळाल्या आहेत. ‘गँगस्टर’ मधून मी पदार्पण केलं होतं, त्यानंतर मला तिकीट ऑफर करण्यात आले होते. माझे आजोबा तीन वेळा आमदार राहिले होते.
त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा कुटुंबातून येता आणि थोडे यशस्वी होता तेव्हा स्थानिक नेते तुमच्याशी संपर्क साधतात. ही खूप सामान्य गोष्ट आहे. खरं तर, माझ्या वडिलांनादेखील एक ऑफर आली होती. ॲसिड हल्ल्यातून वाचल्यानंतर माझ्या बहिणीला राजकारणात येण्याची ऑफर आली. त्यामुळे आमच्यासाठी राजकारणात येण्यासाठी ऑफर येणं ही मोठी गोष्ट नाही. जर मला राजकारणाची आवड नसती तर मला इतका त्रास सहन करावा लागला नसता.”