हिमाचल प्रदेशातून लोकसभा निवडणूक जिंकणारी कंगना रणौत सीआयएसएफ जवानाने कानशिलात लगावल्याने चर्चेत आहे. कंगना रणौत दिल्लीला निघाली असताना चंदिगड विमानतळावर महिला जवानाने तिच्या कानाखाला मारली. या घटनेवर बॉलिवूडमधून प्रतिक्रिया येत असताना ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यादेखील व्यक्त झाल्या आहेत.
शबाना आझमी यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. मला कंगनाबद्दल फार काही आपुलकी नाही असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आहे. शबाना आझमी यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "मला कंगनाबद्दल फार काही आपुलकी नाही. पण तिला कानाखाली मारल्यानंतर जे काही सेलिब्रेशन सुरु आहे त्यात मी सहभागी होऊ शकत नाही. जर सुरक्षारक्षकांनी कायदा आपल्या हातात घेण्यास सुरुवात केली तर आपल्यापैकी कोणीच सुरक्षित राहू शकत नाही".
हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून निवडणूक जिंकणारी कंगना रणौत दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचली होती. यावेळी सीआयएसएफ जवान कुलविंदर कौरने कंगना रणौतच्या कानाखाली लगावली. या घटनेचा व्हिडीओ काही मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओत कंगना चेक इन काऊंटवर पोहोचल्यानंतर शाब्दिक वाद होताना दिसत आहे. पण व्हिडीओत कानाखाली लगावतानाचा क्षण कैद झालेला नाही.
या घटनेनंतर कंगना रणौतने व्हिडीओ जारी करत आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं. तसंच पंजाबमधील वाढत्या दहशतवादावर चिंता व्यक्त केली होती. "मी सुरक्षित आहे. मी पूर्णपणे ठीक आहे. सुरक्षा तपासणीच्या वेळी ही घटना घडली.महिला सुरक्षारक्षकाने मी तेथून बाहेर पडण्याची वाट पाहिली. नंतर तिने बाजूने येऊन माझ्यावर हात उचलला. मी विचारलं की मला का मारलं? ती म्हणाली, 'मी शेतकऱ्यांचे समर्थन करते'. मी सुरक्षित आहे, पण पंजाबमधील वाढत्या दहशतवादाची मला चिंता आहे. ते आपण कसं हाताळणार आहोत?", असं कंगनाने व्हिडीओत सांगितलं होतं.
कंगनाला कानशिलात लगावणारी कॉन्सटेबल कुलविंदर कौरने तिने शेतकऱ्यांचा अनादर केल्याने कानाखाली लगावल्याचं सांगितलं. "कंगनाने 100 रुपये घेऊन आंदोलन करत असल्याचं म्हटलं होतं. ती तिथे जाऊन बसणार आहे का? माझी आई तिथे आंदोलनाला बली होती. त्यावेळी तिने हे विधान केलं होतं," असं तिने सांगितलं होतं. दरम्यान कुलविंदर कौरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.