नवी दिल्ली : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतला वादग्रस्त वक्तव्य करणे चांगलेच महागात पडले आहे. कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शेतकरी संघटना आणि विरोधकांनी तिच्यावर आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. कंगनाच्या वक्तव्यावर भाजप नेतृत्वाने देखील नाराजी व्यक्त केली आहे.
शेतकरी आंदोलनावर भाजप खासदार कंगना राणावत यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून फटकारल्यानंतर कंगना यांनी गुरुवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. कंगना यांनी भाजप अध्यक्षांची भेट घेण्याची ही दुसरी वेळ आहे. कंगना यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला तीन रद्द केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनावर कथित अपमानास्पद टिप्पणी करून वादाला तोंड फोडले होते.
कंगना यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली लोक हिंसाचार पसरवत आहेत आणि तेथे बलात्कार आणि हत्या होत आहेत. या मुलाखतीची चित्रफीतही त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली होती.
त्यात त्यांनी म्हटले होते की, देशाचे नेतृत्व मजबूत नसते तर भारतातही ‘बांगलादेशसारखी परिस्थिती’ निर्माण होऊ शकते. तसेच त्यांनी चीन आणि अमेरिकेवर ‘कारस्थान’ केल्याचा आरोप केला. त्यांच्या या वक्तव्यावर झालेल्या वादानंतर भाजपने राणावत यांच्या विधानावर असहमती व्यक्त करत वादापासून दूर राहणे पसंत केले होते. भविष्यात असे कोणतेही वक्तव्य करू नये, अशा सूचनाही पक्षाने कंगनांना दिल्या. यानंतर, काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत सत्ताधारी पक्षाला राणावत यांची हकालपट्टी करण्यास सांगितले.