येमेनमधून निमिषाच्या कुटुंबीयांना आणि तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची बातमी समोर आली आहे. येमनच्या तुरुंगात बंद असलेल्या भारतीय नर्स निमिषा प्रिया हिची फाशी तूर्तास टळली आहे.
भारताचे ग्रँड मुफ्ती अबुबकर अहमद हे पीडित तलालच्या कुटुंबाशी बोलणी करत आहेत. चर्चेची पहिली फेरी सकारात्मक झाल्याने पुढेही तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. याच कारणामुळे येमनच्या न्याय विभागाने फाशीची शिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. येमनमधील शरिया कायद्यानुसार, जर पीडित कुटुंबाने पैसे (ब्लड मनी) स्वीकारले, तर ते दोषीला माफ करू शकतात. याच कायद्याच्या आधारे निमिषाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
धोका अजून टळलेला नाही
हे महत्त्वाचे आहे की, निमिषा प्रियाची फाशीची तारीख फक्त पुढे ढकलण्यात आली आहे, फाशी रद्द झालेली नाही. याचा अर्थ धोका अजूनही कायम आहे.
निमिषाच्या कुटुंबाने तलालच्या कुटुंबाला १ मिलियन डॉलर (सुमारे ८.५ कोटी रुपये) देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, 'ब्लड मनी' स्वीकारायचा की नाही, याचा अंतिम निर्णय तलालच्या कुटुंबालाच घ्यायचा आहे. जर त्यांनी पैसे स्वीकारण्यास नकार दिला, तर निमिषाला वाचवण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही.