समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, नाशिकरोडसह जिल्ह्यातील 12 भाविकांवर काळाचा घाला
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, नाशिकरोडसह जिल्ह्यातील 12 भाविकांवर काळाचा घाला
img
Chandrakant Barve

छत्रपती संभाजीनगर (भ्रमर वृत्तसेवा) :- बुलढाणा येथील सैलानी बाबाचे दर्शन करून नाशिककडे परतत असणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला आहे. वैजापूर जवळील समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्यावर उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्स बसने जोराची धडक दिली. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 5 वर्षांच्या मुलीचा देखील समावेश आहे. तसेच अपघातात 23 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. 

या अपघातातील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील तसेच नाशिकरोड, इंदिरानगर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  नाशिक येथील काही भाविक बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबाच्या दर्गा येथे दर्शनासाठी खासगी ट्रॅव्हल्स बस करून गेले होते. खासगी बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी बुलढाण्याकडून नाशिककडे जात असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग वैजापूर जांबरगाव शिवारात असलेल्या टोलनाक्यावर प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रकला तपासणी करण्यासाठी थांबवले होते. ट्रक चालक वाहन बाजूला घेत असताना पाठीमागून येणारी ट्रॅव्हल्स बस ट्रकवर जोराची आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅव्हल्स बसच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला. 

यामध्ये 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 5 वर्षांच्या चिमुकलीचा देखील समावेश आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या वतीने तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळावरून जखमी रुग्णांना तात्काळ स्थानिक रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची गांभीरता लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालय सज्ज करण्यात आले असून घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच या घटनेतील मृतांच्या वारसांना पंतप्रधान फंडातून दोन लाख तर जखमींना 50  हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अपघाताच्या वृत्ताने अतिशय दु:ख झाले असून मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून मदत व बचावकार्य सुरू असल्याचेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले. 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना त्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असून अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करून तपास करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवास यांनी ट्वीट करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना फडणवीसांनी दिल्या आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group