इस्रोच्या चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाले आहे. इस्रोचे चांद्रयान-3 आज 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले आहे. भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेली आहे. ऊर आनंदाने भरून आला आणि प्रत्येकजण इस्रोच्या शास्त्रज्ञांना कडक सॅल्युट करत एवढचं म्हणतोय... गर्व आहे मला, मी भारतीय असल्याचा... कारण, भारताच्या चंद्रयानाने चंद्राला अलिंगन दिले आहे. इस्रोचे चांद्रयान-3 चंद्राच्या कुशीत शिरले आहे. आधीच्या चंद्रमोहिमांच्या अपयशाची जळमटं क्षणार्धात कुठल्या कुठं झटकून टाकली गेली आहेत.
भारतासह जगातील प्रत्येकाच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या. जसजसा लँडिंगचा क्षण जवळ येत होता, तसतशी धाकधूक वाढत गेली, श्वास रोखले गेले, हात जोडले गेले आणि डोळे मिटले गेले आणि बातमी आली की चांद्रयान-3 मोहीम फत्ते झाली. प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात, जिथं जगातलं कुणीच गेलेलं नाही, अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या उंबरठ्याला भारताने गवसणी घातली आहे.
भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. आज प्रत्येक देशवासीयाप्रमाणेच माझेही मन या चांद्रयान मोहिमेकडेच जोडलं गेलं होते, असं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तसंच सगळ्या वैज्ञानिकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले.
हा क्षण अविस्मरणीय आहे, अभूतपूर्व आहे. हा क्षण आहे विकसित भारताचा, नव्या भारताच्या आगमनाचा आहे. हा क्षण आहे संकटांचा महासागर पार करण्याचा...हा क्षण आहे चंद्रावर चालण्याचा... विजयाचा मार्ग
- पंतप्रधान नरेंद्र मोदी