नाशिक (प्रतिनिधी) :- आराम करायला मिळावा, आरामदायी जीवन जगावे अशी सवय असलेल्या पत्नीने दोन जणांशी संगनमत करून पतीला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विशाल (रा. बोरगड, नाशिक) हे पत्नी व मुलीसह येथे राहतात. दरम्यान, पत्नीने दोन अनोळखी इसमांना बरोबर घेऊन पतीला ठार मारण्याचा कट रचला.
दि. २७ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास राहत्या घरी पत्नी पती विशाल सोबत प्रथम बिअर प्यायली. त्यानंतर एक जण हेल्मेट व सॅक घेऊन त्यांच्या घरी आला. या आरोपींनी मिळून पाटील यांचा गळा दाबून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला; मात्र ते अयशस्वी झाल्याने पत्नीने बोलावलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या सॅकमध्ये आणलेल्या साप त्याच्याजवळ नेत त्या सापाने पतीच्या मनगटाला चावा घेतला.
एवढे होऊनही प्रयत्न असफल ठरत असल्याचे पाहून चिडलेल्या पत्नीने घरात असलेल्या बेडरूममधील उशी आणून तिच्या सहाय्याने पतीचे तोंड दाबले, तसेच हेल्मेटने मारहाण करून पतीला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडत असताना विशालने तेथून पळ काढला. त्याने मित्राच्या मोबाईल वरुन वडीलांना संपर्क साधत आपबिती कथन केली. त्यांनी त्वरित त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात पत्नीसह दोन अनोळखी इसमांसह गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.