सिटी लिंक वाहकांचा पुन्हा संप; 12 वीच्या विद्यार्थ्यांबरोबरच नाशिककरांची मोठी गैरसोय
सिटी लिंक वाहकांचा पुन्हा संप; 12 वीच्या विद्यार्थ्यांबरोबरच नाशिककरांची मोठी गैरसोय
img
सुधीर कुलकर्णी

नाशिक (सुधीर कुलकर्णी) :- सिटी लिंकच्या तपोवन डेपोतील वाहकांनी आज सकाळपासून अचानक बंद पुकारला. याबाबतीत नागरीक अनभिज्ञ असल्याने बसच्या प्रतीक्षेत असलेले नेहमीचे विद्यार्थी, कंपनी कामगार, महिला, नागरिक यांची मोठी तारांबळ उडाली.

 तपोवन डेपोतील वाहकांनी हा संप पुकारला असून नाशिकरोड डेपोतील बसेस मात्र सुरळीत चालू आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत सिटी लिंक या बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. सदर बससेवा ठेकेदार पद्धतीने दिले गेले असल्यामुळे त्याची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे सिटीलिंकच्या तपोवन डेपो येथे दीडशे तर नाशिकरोड डेपोच्या सुमारे 100 बसेस असून त्याद्वारे सुमारे 600 ते 700 चालक वाहक आपली सेवा बजावत आहेत.

तपोवन डेपो अंतर्गत असलेल्या बसवाहकांनी आज सकाळी अचानक संप पुकारल्याने 12 वीच्या परिक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांचीही मोठी गैरसोय झाल्याने पालक संतप्त झाले. या वाहकांना तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने तसेच फेब्रुवारी 2023 पासून पीएफ व इएसआय त्यांच्या खात्यावर जमा न केल्याचे वाहकांचे म्हणणे आहे. गेल्या संपाच्यावेळी ठेकेदाराने विकली ऑफचे दोन वर्षांचे न दिलेले पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तेही पूर्ण केले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

काहींचे बोनसही देणेही बाकी असल्याचे समोर आले. या सर्व बाबींचे एक निवेदन काल सायंकाळी युनियनच्या प्रतिनिधीने सिटीलिंकच्या ऑफीसमध्ये दिले होते. या संपामुळे सिटीलिंकचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जोपर्यंत वरील सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप सुरूच ठेवण्याचा पवित्रा वाहकांनी घेतला आहे. 

काही महिन्यांपूर्वीच पगारावरुन वाहकांनी संप पुकारला होता. तडजोड करीत आंदोलन मागे घेऊन काम सुरळीत सुरू झाले होते. मात्र दिलेल्या आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे सिटीलिंकच्या वाहकांनी पुन्हा संप पुकारला. कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक वाहकांच्या या बस बंद आंदोलनामुळे नाशिकरांची मोठी गैरसोय झाली.

शाळा महाविद्यालयात तसेच कंपनीतील कामगार आदींच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी बस स्थानकावर येऊन बसची प्रतीक्षा केली. मात्र बसेस येत नसल्याने चौकशी केली असता हा संप पुकारला असल्याचे त्यांना समजले. 12 वीचे पेपर सुरू असल्याने सकाळी विद्यार्थ्यांची धावपळ झाली. उद्यापासून 10 वीचे पेपरही सुरू होत असून, यावर लवकर तोडगा काढावा अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे. 

वरिष्ठ पातळीवर मार्ग काढणार
वाहकांनी आज वेतन न मिळाल्याने अचानक संप पुकारला. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या समजावून घेत त्या वरिष्ठ पातळीवर तोडगा काढणार असल्याचे सिटीलिंकच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. वारंवार संप होत असल्याने ठेकेदारावर वेळोवेळी दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची प्रोसेस सुरू आहे. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी व मनपा आयुक्त वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन कायमचा तोडगा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठेकेदार बदलण्यासाठी निविदाही प्रसिद्ध करण्यात आली. मात्र त्यासही प्रतिसाद मिळाला नाही. 

आज बारावी सायन्सचा पेपर आहे. माझा मुलगा नेहमीप्रमाणे बसची जवळजवळ अर्धा तास वाट पाहत होता.  परंतु बस येत नसल्याने त्याने निमाणी बस स्थानकावर विचारपूस केली. तेव्हा त्याला माहिती मिळाली आज बस कर्मचाऱ्यांचा संप आहे. मुलगा घरातून निघाल्यापासून संप असल्याची  कल्पना किंवा इतर दैनिकांमध्येही त्याविषयीची बातमी नसल्याने  मुलाची धावपळ उडाली. अखेर मुलगा कसा बसा परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचला. असे प्रकार ऐन परीक्षेच्या वेळेस व्हायला नको. त्यातून पालकांना व ज्यांचे भविष्य घडणार आहे त्या विद्यार्थ्यांना देखील मनस्ताप सहन करावा लागतो. याची दखल सिटी लिंक बस व्यवस्थापनाने घ्यायला हवी किंवा काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. - नरेंद्र खैरनार, पालक

कंपनी व कंत्राटदार यांच्यातील अंतर्गत वादामुळे हे प्रकरण उभे राहिले असून नियम डावलून डिसेंबरमध्ये पगार देखील असताना काहींचे पेमेंट केले तर काहींचे  पेमेंट बाकी ठेवले अशी ओरड होत असून वाहकांनी अचानक बंद पुकारला यावर अंतर्गत बोलणे होऊन लवकरच संप मिटेल अशी आशा आहे.
 - बाजीराव माळी,  मुख्य महाव्यवस्थापक (सिटी लिंक)

एजन्सीकडून बिल केल्यानंतर संबंधित कागदपत्रे मनपाच्या या विभागाला सादर केली जातात त्यानंतर रक्कम अदा केली जाते. परंतु कागदपत्रे वेळेवर येत नसल्याने पेमेंट अदा करताना अडचणी येत आहेत.
- राजेश वाघ, व्यवस्थापक (सिटी लिंक) 

इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group