भारतीय नर्स निमिषा प्रिया हिला येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिच्या फाशीला आता अवघा एक दिवस उरला आहे. 16 जुलैला तिला फाशी देण्यात येणार आहे. निमिषा प्रियाला वाचवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी होताना दिसत आहेत.
केंद्र सरकारने सांगितलं की, जो पर्यंत मृतकाचा परिवार दया दान स्वीकारायला तयार होत नाही, तो पर्यंत चर्चेला काही अर्थ नाही. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला या प्रकरणात स्थिती रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सोमवारी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं की, निमिषाची फाशी रोखण्यासाठी सरकारकडे कुठलाही पर्याय उरलेला नाही. भारताचे ग्रांड मुफ्ती कंठपुरम एपी अबूबकर मुसलियार यांच्या हस्तक्षेपानंतर आता निमिषाच्या वाचण्याची एक छोटीसी आशा निर्माण झाली आहे.
ग्रांड मुफ्तीच्या विनंतीला मान देऊन येमेनमध्ये विचार विनिमय सुरु झाला आहे. याचं नेतृत्व येमेनचे प्रसिद्ध सूफी विद्वान शेख हबीब उमर करत आहेत. शेख हबीब यांचे प्रतिनिधि हबीब अब्दुर्रहमान अली मशहूर यांनी उत्तर येमेनमध्ये एक इमरर्जन्सी मीटिंग बोलावली आहे. येमेनी सरकारचे प्रतिनिधी, गुन्हेगारी न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश, तलालचा भाऊ आणि आदिवासी नेत्यांची भेट घेतली. या बैठकीत काय चर्चा झाली? त्या बद्दल अजून माहिती समोर आलेली नाही. ग्रांड मुफ्तीच्या हस्तक्षेपानंतर निमिषाच्या वाचण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
निमिषावर काय आहे आरोप ?
केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील कोल्लेंगोडे येथे राहणारी निमिषा प्रिया 2008 मध्ये रोजगारासाठी येमेनला गेली होती. 2020 साली येमेनमध्ये एका व्यक्तीची हत्या केल्याबद्दल तिला दोषी ठरवण्यात आलं. हा व्यक्ती निमिषाचा बिझनेस पार्टनर होता. याच आरोपातून निमिषा प्रियाला 16 जुलै रोजी फाशी देण्याचे आदेश दिले आहेत.