निमिषा प्रियाच्या फाशीला उरलेत अवघे २ दिवस ! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी
निमिषा प्रियाच्या फाशीला उरलेत अवघे २ दिवस ! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी
img
दैनिक भ्रमर
येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या केरळच्या नर्स निमिषा प्रिया हिला वाचवण्यासाठी अखेरचे दोन दिवस उरले आहेत. १६ जुलै रोजी तिला फाशी दिली जाणार असून, या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय आज एका महत्त्वपूर्ण याचिकेवर सुनावणी करणार आहे. केंद्र सरकारने तातडीने राजनैतिक मार्गांचा वापर करून निमिषाला वाचवावं, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.

निमिषा प्रियावर २०१७ मध्ये तिचा येमेनी व्यावसायिक भागीदार तलाल याची हत्या केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यासाठी तिला येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निमिषाला वाचवण्यासाठी तिचं कुटुंब जीवाचं रान करत आहे.

२०१७ मध्ये काय घडलं ?
येमेनमधील न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, जुलै २०१७ मध्ये निमिषा प्रियाने कथितरित्या तिचा स्थानिक व्यावसायिक भागीदार तलाल अब्दो महदी याला अंमली पदार्थ देऊन त्याची हत्या केली. त्यानंतर दुसऱ्या एका नर्सच्या मदतीने तिने त्याच्या शरीराचे तुकडे केले आणि हे अवयव एका भूमिगत टाकीत फेकले. महदीच्या हत्येचा खुलासा झाल्यानंतर निमिषाला अटक करण्यात आली आणि तिने एका निवेदनात हत्येची कबुली दिली होती, असं सूत्रांनी सांगितलं.

येमेनच्या राष्ट्राध्यक्षांकडून माफी नाही!
सना येथील कनिष्ठ न्यायालयाने निमिषाला फाशीची शिक्षा सुनावली होती. तिने या निर्णयाला येमेनच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं, परंतु तिचं अपील फेटाळण्यात आलं आणि फाशीची शिक्षा कायम राहिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निमिषाने नंतर यमनच्या राष्ट्राध्यक्षांकडे दयेची भीक मागितली, पण त्यांनी तिला माफ करण्यास नकार दिला. धक्कादायक बाब म्हणजे, मृत तलाल अब्दो मेहदीचं कुटुंब हत्येच्या गुन्ह्यासाठी 'ब्लड मनी' स्वीकारण्यासही तयार नाही, असं म्हटलं जात आहे. निमिषा प्रियासाठी सर्व कायदेशीर प्रयत्न करण्यात आले, पण तिच्याविरुद्धचे आरोप इतके गंभीर होते की, सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. 

कोणी दाखल केली याचिका?
अधिवक्ता सुभाष चंद्रा के.आर. यांनी निमिषा प्रियाच्या वतीने ही याचिका दाखल केली आहे. ब्लड मनी दिल्यास पीडित कुटुंब केरळच्या या नर्सला माफ करेल आणि त्यामुळे निमिषाची फाशी थांबेल, असा युक्तिवाद यात करण्यात आला आहे. निमिषा प्रियाच्या कुटुंबाने 'ब्लड मनी' म्हणून ८.६ कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. तलालच्या कुटुंबाने ही रक्कम स्वीकारून निमिषाचा जीव वाचवावा, अशी आशा कुटुंबाला आहे. मात्र, या आधी तलालच्या कुटुंबाने पैसे स्वीकारण्यास नकार दिला होता. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group