नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) :- लग्नाचे आमिष दाखवून उच्चशिक्षित तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा तीन वेळा गर्भपात करणाऱ्या विवाहित इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी पीडित तरुणी ही मूळची मनमाड येथील असून, ती नोकरीनिमित्त नाशिक येथील पाथर्डी फाटा परिसरात राहते. दरम्यान, ती जून 2021 ते जून 2023 या कालावधीत भाडेतत्त्वावर राहत असे. यादरम्यान पीडितेची आरोपी संदीप सुधाकर दिघे (वय 38, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) याच्याशी येथे एका जिममध्ये ओळख झाली. त्या ओळखीचे रूपांतर चांगल्या मैत्रीत झाले. आरोपी हा विवाहित असला, तरी तो या पीडितेला बाहेरच्या कामांमध्ये मदत करीत असे. या निमित्ताने तो जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता. कोरोनाच्या काळात पीडितेला दवाखान्यात नेण्याचे व उपचार करण्यासाठी आरोपी संदीप दिघे याने प्रयत्न केले.
यादरम्यान त्यांच्यात मैत्रीचे नाते अधिक घट्ट झाले. त्यानंतर आरोपी संदीप दिघे याने पीडितेला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून “माझ्या पत्नीला सोडून तुझ्याशी लग्न करीन,” असे सांगितले; मात्र ही बाब आरोपीने त्याच्या घरी कोणालाही सांगितली नाही. दोघांचीही ओळख झाल्यानंतर पीडितेचे आरोपीच्या घरी जाणे-येणे होते. संदीप दिघे याची पत्नी, आई, भाऊ, वहिनी हे सर्व जण पीडितेला त्याची चांगली मैत्रीण म्हणून मानायचे. त्यादरम्यान पीडितेने संदीप दिघेच्या घरच्यांना प्रेमप्रकरणाबाबत सांगायचा प्रयत्न केला; मात्र दिघे हा तिला जिवाचे काही बरेवाईट करण्याची धमकी देऊन वेळ मारून नेत असे. त्यानंतर काही दिवसांनी दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. त्यादरम्यान जानेवारी 2022 मध्ये पीडिता ही गर्भवती असल्याचे समजले. त्यावेळेस पीडितेने आरोपीला लग्नाबाबत विचारले असता घरच्यांना विश्वासात घेऊन “आपण सर्व घरच्यांना सांगू,” असे म्हणाला. त्यानंतर पीडितेला काही तरी गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला.
त्यानंतरही त्यांचे भेटणे सुरूच होते. दरम्यान, जून 2022 मध्ये पुन्हा पीडिता गर्भवती राहिली. पुन्हा आरोपीने तिला गर्भपात करण्यास सांगितले. त्यावेळी त्याने दिलेल्या गोळ्या घेतल्याने तो गर्भपात झाला. त्यानंतर आरोपी दिघे याने तिला पुन्हा चेहेडी येथील एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे तिच्यावर उपचार केले. काही दिवस उलटत नाहीत, तोच ऑगस्ट 2022 मध्ये ही पीडिता पुन्हा तिसऱ्यांदा गर्भवती राहिली. त्यादरम्यान, पीडितेला आरोपी संदीप दिघे याचे अन्य एका महिलेशी अफेअर असल्याचे समजले. त्याबाबत पीडितेने संदीपला विचारले असता प्रथम त्याने नकार दिला; मात्र त्यानंतर त्याने अन्य एका महिलेशी अफेअर असल्याचे पीडितेसमोर मान्य केले.
हा प्रकार समजल्यानंतरही पीडितेने पोटातील गर्भ राहू द्यायचे ठरविले. यामुळे चिडलेला आरोपी संदीप दिघे याने पीडितेला सांडशी व लाटण्याने मारहाण करणे, पोटावर लाथा मारणे, तसेच ढकलून देणे, चावा घेणे असे प्रकार सुरू केले. दोघांमध्ये या कारणावरून सतत वादविवाद सुरू होते. “तू शांत राहिलीस, तर आपले लग्न होईल,” असे आरोपी संदीप तिला सांगायचा. त्यामुळे पीडितेने याबाबत कुठेही तक्रार केली नाही किंवा कोणालाही सांगितले नाही. त्यानंतर आरोपी संदीप दिघेने पीडितेच्या मित्र-मैत्रिणींना फोन करून याबाबत सांगितले. त्याच वेळी नोव्हेंबर 2022 मध्ये पीडिता चार महिन्यांची गर्भवती असताना आरोपी दिघे याने एके दिवशी पीडितेला गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या; मात्र त्या गोळ्या घेण्यास पीडितेने नकार दिला.
काही दिवसांनी आरोपी दिघे याने पीडितेला जेवणातून दिलेल्या औषधामुळे पीडितेचा गर्भपात झाला. याबाबत विचारणा केली असता आरोपीने तिला उडवाउडवीची उत्तरे दिली. यावरून आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर पीडितेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात आरोपी संदीप सुधाकर दिघे याच्याविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.