अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि राज निदिमोरूच्या अफेयरच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होत्या. मात्र याबाबत ती स्पष्टपणे कधीही माध्यमांवर बोलली नाही. दरम्यान या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून समंथा रुथ प्रभू आणि राज निदिमोरू यांनी लग्न केल्याचं समोर आलं आहे.
'द फॅमिली मॅन'चे दिग्दर्शक राज निदिमोरूशी समंथाने दुसरं लग्न केलं आहे. आज १ डिसेंबर रोजी सकाळी कोइंबतूरमधल्या ईशा फाऊंडेशनच्या लिंग भैरवी मंदिरात त्यांनी लग्न केल्याचं कळतंय. या लग्नाला फक्त 30 पाहुणे उपस्थित होते.
राज निदिमोरूचा जन्म 4 ऑगस्ट 1979 रोजी झाला, तर समंथाचा जन्म 28 एप्रिल 1987 रोजी झाला. म्हणजेच या दोघांच्या वयात सात ते आठ वर्षांचं अंतर आहे. राज निदिमोरूचंही हे दुसरं लग्न आहे.
समंथाने 2017 मध्ये नाग चैतन्यशी पहिलं लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. समंताने राजसोबत 'द फॅमिली मॅन 2' आणि 'सिटाडेट - हनी बनी' या वेब सीरिजमध्ये काम केलंय.
राज निदिमोरूने सहाय्यक दिग्दर्शिका श्यामली डे हिच्याशी पहिलं लग्न केलं होतं. राज निदिमोरू आणि श्यामली डे यांनी 2022 मध्ये घटस्फोट घेतला. राज दिग्दर्शक, लेखक आणि निर्मातासुद्धा आहे. कृष्णा डीकेसोबतची त्याची जोडी लोकप्रिय आहे. या दोघांनी मिळून 'द फॅमिली मॅन' या गाजलेल्या वेब सीरिजचं दिग्दर्शन केलंय.