नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : अधिकारी असल्याचे खोटे सांगून महिलेसोबत मैत्री करून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला आठ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की 23 वर्षीय पीडित तरुणी ही जेलरोड परिसरात राहत असून, ती नोकरी करते. आरोपी सदाशिव बैजनाथ कदम (वय 29, रा. पोन्ना, तेलंगणा) याने या पीडित तरुणीसोबत मैत्री केली, तसेच आरपीएफमध्ये अधिकारी असल्याचे खोटे सांगून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी सलगी केली.
त्यानंतर आरोपी सदाशिव कदम याने दि. 1 डिसेंबर 2023 ते दि. 22 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पीडित तरुणीकडून वेळोवेळी आठ लाख रुपये घेऊन तिची आर्थिक फसवणूक केली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात आरोपी सदाशिव बैजनाथ याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बैसाणे करीत आहेत.