दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा काही दिवसात सुरु होणार आहे. दरम्यान, आता बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट दिले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे होणाऱ्या बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेची हॉल तिकीट सोमवारी पासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.
बारावीची परीक्षा फेब्रुवारीत सुरु होणार आहे. त्यासाठी एक महिनाभर आधी म्हणजे १२ जानेवारीपासून हॉल तिकीट दिले जाणार आहे. सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर सोमवारपासून उपलब्ध होणार आहेत, याबाबत राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी माहिती दिली आहे.
ऑनलाईन हॉल तिकीट डाउनलोड कसे करावे
विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in किंवा http://www.mahahsscboard.in प्रवेश करून अॅडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात. प्रत्येक विभागातील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध असतील.
विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र प्रिंट करून घ्यावे आणि त्यावर शाळेतील मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. ही जबाबदारी संबंधित शाळा किंवा महाविद्यालयांची असेल. जर प्रवेशपत्रावरील नाव, आईचे नाव, जन्मतारीख किंवा इतर माहिती चुकीची असेल तर विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने फी भरून दुरुस्ती अर्ज सादर करू शकतात. यामुळे परीक्षा केंद्रावर अडचण टाळता येईल.
विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्राची प्रत नेहमी जवळ ठेवावी, कारण परीक्षा दरम्यान ही दाखवणे अनिवार्य आहे. योग्य माहिती आणि वेळेवर प्रवेशपत्र मिळाल्यामुळे परीक्षेची तयारी सुरळीत होईल. म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले अॅडमिट कार्ड डाउनलोड करून तपासणी करून, प्रिंट करून घ्यावी आणि आवश्यक असल्यास दुरुस्ती अर्ज सादर करावा.