गायक पलाश मुच्छल याने सांगलीतील युवकाची ४० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी सांगली येथील विज्ञान माने या युवकाने बुधवारी (दि.21) सायंकाळी सांगलीच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली असून, या तक्रारीमुळे खळबळ उडाली आहे.
तक्रारदार विज्ञान माने हा पलाश मुच्छलची एक्स गर्लफ्रेंड आणि भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचा बालमित्र आहे. विज्ञान माने हा चित्रपट फायनान्सर म्हणून कार्यरत आहे. दरम्यान, स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह मोडल्यानंतर काही आठवड्यांनी हा फसवणुकीचा प्रकार समोर आलाय.
विज्ञान माने हा युवक मराठी सिनेसृष्टीशी जोडलेला असून त्याने काही चित्रपटांसाठी फायनान्सर म्हणून काम केले आहे. स्मृती मंधानाचा बालमित्र म्हणून ओळखला जाणारा विज्ञान माने आणि पलाश यांची ओळख स्मृतीच्या कुटुंबीयांमार्फत झाली होती. यावेळी, पलाशने त्याच्या आगामी ‘नजरिया’ नावाच्या चित्रपटात गुंतवणूक करण्यासाठी मानेकडून पैसे घेतले होते. त्यानुसार, चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यावर गुंतवणूकदारांना पैसे परत मिळतील, असे आश्वासनही दिले होते.
मात्र पुढे चित्रपटाचे काम पूर्ण न झाल्यामुळे आणि पैसे परत न मिळाल्यामुळे माने यांनी पलाशकडे रक्कम परत मागितली. मात्र, पलाशकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने चर्चा सुरू झाली. यानंतर विज्ञान माने यांनी तक्रार दाखल केली असून, त्यांनी पलाशकडून संपर्क होत नसल्याचे सांगितले आहे. त्याने मोबाईल नंबर ब्लॉक केला असल्याचा आरोपही केला आहे.
या आरोपांपूर्वीही पलाश आणि स्मृती मंधानाच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर भरपूर चर्चा झाली आहे. स्मृती आणि पलाश यांचे लग्न 2025 मध्ये होते, परंतु नंतर थेट रद्द झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दोघांनी सोशल मीडियाद्वारे स्वतंत्रपणे हा निर्णय सांगितला.पलाश किंवा त्यांच्या टीमकडून अद्याप या आर्थिक फसवणुकीच्या आरोपांवर कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. सांगली पोलिसांनी या तक्रारीची चौकशी सुरू केली असून पुढील कायदेशीर कारवाई कशी पुढे जाते, याकडे सर्वांची नजर लागली आहे.