राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनातून महाराष्ट्र अद्यापही सावरलेला नाही. अजित पवारांचा झालेला विमान अपघात यावर अनेक बड्या नेत्यांकडून शंका उपस्थित होत आहेत. अशातच राज्यातील आणखी एक नेता अपघातातून थोडक्यात बचावला आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी स्वतः त्यांच्या अपघाताबद्दल माहिती दिली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने काल छत्रपती संभाजी नगर येथे संजय शिरसाट यांची प्रचाराची सभा होती. यावेळी त्यांनी भाषण करताना काळ वेळ कशी सांगून येत नाही हे मतदारांना सांगत असतानाच त्यांच्या अपघाताचा किस्साही सांगितला.
मंत्री संजय शिरसाट यांनी या अपघाताबाबत बोलणारा म्हटले की, कालची घटना सांगतो, माणसाचा काही भरवसा नाही. अजितदादा गेले की नाही? कुणाला वाटलं होतं का असं काही होईल? काल माझी ही बारी आली होती. थोडक्यात वाचलो. येताना माझी गाडी एका खड्डयात आदळली आणि कारचे दोन्ही डावे टायर फुटले. मर्सिडीज गाडी होती. दुसरी गाडी इनोव्हा होती. ती घरी आतापर्यंत आली नाही. काय भरवसा नाही माणसाच्या आयुष्याचा. काल काही बरं वाईट झालं असतं तर तुम्ही मला आज श्रद्धांजली वाहिली असती. पण पुण्य केल्याच्या जोरावर आज मी जिवंत आहे, असं शिरसाट म्हणाले.
मी सर्वांना सांगतो. तुम्हाला मिळालेला आजचा दिवस चांगला घालवा. उद्याच्या दिवसाची चिंता करू नका. उद्याचा दिवस निघो अथवा नको निघू. ही ताकद जेव्हा तयार होते. तेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची चिंता राहत नाही. उमेदवारांनो टेन्शन घेऊ नका. मी जेवढा नम्र वागतो तेवढंच तुम्हीही लोकांशी नम्र वागा. अर्विभावात जाऊ नका. हे मतदार आहेत, असा सल्लाही त्यांनी दिला.