लातूर : मागील काही दिवसात सातत्याने तुरीचे भाव वाढत आहेत. अशातच बारा हजार रुपये क्विंटलने आज तुरीची बाजारात खरेदी झाली आहे. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करुन बाजारात ज्यावेळेस तुरडाळ येते त्यावेळेस त्याचेही भाव वाढताना दिसत आहेत. आज किरकोळ बाजारात तुरडाळीचा भाव हा 175 रुपये किलो आहे. ऐन सणासुदीत तूरडाळ महाग झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी 100 रुपयांवर असलेली तूरडाळ आता 160 ते 175 रुपये किलोवर गेली आहे.
हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळींच्या दरातही दोन महिन्यांत सरासरी 20 ते 30 रुपयांची वाढ झाली असून, डाळींच्या दरातील तेजी वर्षभर कायम राहण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी झालेले कमी उत्पादन आणि जागतिक बाजारातील कडधान्यांच्या चढ्या दरामुळे देशांतर्गत बाजारात डाळींच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. तूरडाळ दोन महिन्यांत 100 ते 110 रुपयांवरुन 160 ते 170 रुपयांवर गेली आहे. हरभरा डाळ 57 ते 58 रुपयांवरुन 70 रुपये प्रति किलोवर गेली आहे. उडीद डाळ 90 रुपयांवरून 110 रुपये प्रतिकिलो झाली असून, मसूर डाळीतही किलोमागे दहा-बारा रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. मूग डाळ 80 ते 85 रुपयांवरुन 110 रुपयांवर गेली आहे.
देशभरात खरीप हंगामात कडधान्यांच्या लागवडीत घट झाली आहे. जूनअखेरपर्यंत पेरणीयोग्य पाऊस झाला तरच कडधान्यांची लागवड होते. यंदा जुलैअखेरीस पाऊस झाल्यामुळे कडधान्यांचा पेरा घटला आहे. गेल्या वर्षी 25 ऑगस्ट अखेर देशात 128.07 लाख हेक्टरवर कडधान्यांची लागवड झाली होती.
यंदा ती 117.44 लाख हेक्टरवर घसरली आहे. तुरीची लागवड 42.11 लाख हेक्टर, उडीद 31.10 लाख हेक्टर, मूग 30.64 लाख हेक्टर, कुळीथ 0.26 लाख हेक्टर आणि अन्य कडधान्यांची 13.34 लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. लागवडीत घट झाल्यामुळे पुढील वर्षभर डाळींचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.