एका बाजूला लग्नाची लगबग, अवघ्या काही तासांत घुमणारे मंगल अष्टकांचे सूर आणि आनंदाचे वातावरण… पण काही क्षणांतच या आनंदाचे रूपांतर किंकाळ्या आणि रक्ताच्या थारोळ्यात झाले. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर जवळील घोडेमाळ येथे एका लग्नकार्यापूर्वी झालेल्या वादातून ३ जणांची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आलीय. या घटनेनंतर ज्या घरात सनई-चौघड्यांचे सूर घुमणार होते, तिथे आता आक्रोश ऐकू येत आहे.
नेमकं काय घडलं ?
साखरपुड्याच्या कार्यक्रमात झालेल्या वादातून तिघांचा खून झाल्याची धक्कादायक घटना पिंपळनेर परिसरातील घोडेमाळ (ता. साक्री) येथे घडली. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी पिंपळनेर शिवारात असलेल्या घोड्यामाळ (ता. साक्री) येथे विजू गोसावी यांच्या मुलीचा विवाह सोहळा होता.तत्पूर्वी साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना दोन गटांत वाद निर्माण झाला.
प्रत्यक्षात वादाचे मूळ कारण मोबाईलवर ठेवलेले स्टेटस असल्याचे समोर आले आहे. या स्टेटसवरून सोनगड गुजरात येथून आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी वधू पक्षातील व्यक्तींना जाब विचारला. यानंतर शाब्दिक चकमक झाली. यानंतर हळूहळू याचे रूपांतर पाहता पाहता हाणामारीत झाले.
यावेळी संतापलेल्या आरोपींनी सोबत आणलेल्या धारदार चाकूने समोर दिसतील, त्यांच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. या मारामारीत वधू पक्षातील सुरेश गोसावी (५०), साहिल गोसावी (३५) आणि देवेंद्र पवार (३६) यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा व पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केली.
घटनेनंतर संशयित आरोपी ब्रेझा कारमधून गुजरातच्या दिशेने पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पिंपळनेर पोलिसांनी तत्काळ हालचाली करून घाट परिसरात स्थानिक नागरिकांना वाहन क्रमांकाची माहिती दिली आणि ओटाबारी या गुजरात सीमेवरील घाटात वाहतूक कोंडी निर्माण करून संबंधित वाहन अडवण्यात आले. यावेळी तिघांना ताब्यात घेण्यात आले.