हैदराबाद (भ्रमर वृत्तसेवा) - आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात भेसळयुक्त दूध प्यायल्यामुळे 13 जणांचा बळी गेला आहे. दुधात युरियाची भेसळ असल्याचा संशय असून, अनेक जण रुग्णालयात दाखल आहेत.
आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून एक काळजाचा थरकाप उडविणारी घटना समोर आली आहे. कथितरीत्या भेसळयुक्त दूध प्यायल्यामुळे तब्बल 13 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 11 जणांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. या भीषण प्रकारामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून अन्न सुरक्षा विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व गोदावरी जिल्ह्यातील कोरुकोंडा मंडल क्षेत्रातील एका गावात ही घटना घडली.
काही वृद्धांना उलट्या, पोटदुखी आणि लघवी होण्यास त्रास होऊ लागला. प्राथमिक तपासात या रुग्णांच्या किडन्यांमध्ये गंभीर समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले, ज्यासाठी तातडीने डायलिसिसची गरज भासली. अधिक तपास केला असता, या सर्वांनी एकाच डेअरीतून दूध खरेदी केल्याचे समोर आले.
अन्न सुरक्षा विभागाने ’वरलक्ष्मी मिल्क डेअरी’तून दुधाचे नमुने गोळा केले. तपासणीत या दुधामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध झाले आहे. बाधितांच्या रक्त आणि लघवीच्या चाचणीत युरिया आणि सीरम क्रिएटिनिनचे प्रमाण धोकादायक पातळीवर आढळले. या डेयरीने परिसरातील सुमारे 106 कुटुंबांना दूधपुरवठा केला होता.
संबंधित डेयरी युनिट तत्काळ सील करण्यात आले आहे. संशयित आरोपी अड्डाला गणेश्वरराव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बाधित भागात आपत्कालीन वैद्यकीय शिबिरे लावण्यात आली असून रॅपिड रिस्पॉन्स टीम तैनात केली आहे. या घटनेनंतर केवळ आंध्र प्रदेशातच नव्हे, तर शेजारील तेलंगणा राज्यातही दुध डेअरींची तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे.