घरात लग्नाची लगबग, पाहुण्यांची ये-जा आणि चार दिवसांवर येऊन ठेपलेला शुभमुहूर्त... असे आनंदी वातावरण असताना लग्नापूर्वीच नवरदेवाने गळफास घेऊन जीवन संपवले. भंडारा जिल्ह्यात लाखांदूर तालुक्यातील परसोडी पावळदवना येथे ही घटना घडली. २७ वर्षीय राजेश अविनाश भेंडारकर असे या मृत तरुणाचे नाव असून, या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजेश हा गेल्या तीन वर्षांपासून चंद्रपूर येथील दालमिया कंपनीत 'सिक्युरिटी गार्ड' म्हणून नोकरीला होता. त्याचं लग्न १६ मार्च रोजी एरंडी येथील वैष्णवी राजू दोनोडे हिच्याशी होणार होतं. लग्नासाठी अवघे चार दिवस शिल्लक असल्याने घरात लग्नाची लगबग सुरू होती. मात्र, गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास राजेशने घराबाहेरील आंब्याच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या खरेदीसाठी नवरी मुलगी सुद्धा ११ मार्च रोजी राजेशच्या घरी आली होती. सर्व काही सुरळीत सुरू असताना राजेशने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पालांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. राजेशने इतके टोकाचे पाऊल का उचलले?
त्याच्यावर काही मानसिक दडपण होते का? किंवा इतर काही वैयक्तिक कारण होते का? या दिशेने पोलीस तपास करत आहेत. अद्याप कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.