उन्हाळ्यात वाढणारी उष्णता, कडक ऊन आणि उकाडा यांचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. गेल्या काही वर्षांत तापमानात झालेली वाढ, उष्णतेच्या लाटा आणि हवामानातील बदल यामुळे उष्माघातासारख्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
• दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळावे.
• शेतकरी, कामगार आणि मजूर यांनी या वेळेत सावलीत विश्रांती घ्यावी.
• लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना कडक उन्हात बाहेर नेणे टाळावे.
• हलके, सैल व सुती कपडे परिधान करावेत. पांढरा रुमाल, टोपी किंवा गमछा वापरावा.
• दिवसभरात थोड्या-थोड्या प्रमाणात पाणी पिण्याची सवय ठेवावी.
• ताक, लिंबूपाणी, कोकम सरबत, नारळपाणी यांसारखे द्रवपदार्थ नियमित घ्यावेत.
• अतितिखट, मसालेदार पदार्थ तसेच चहा, कॉफी आणि मद्यपान टाळावे.
• कलिंगड, काकडी, द्राक्षे, गाजर, सफरचंद यांसारखे थंड व पौष्टिक पदार्थ आहारात घ्यावेत.
• विनाकारण उन्हात फिरणे टाळावे.
• फ्रिजमधील अतिथंड पाण्याऐवजी माठातील पाणी पिणे अधिक आरोग्यदायी आहे.
• उन्हातून आल्यानंतर थंड किंवा कोमट पाण्याने आंघोळ केल्यास शरीराचे तापमान संतुलित राहते.
उष्माघाताची प्रमुख लक्षणे
उष्माघात झाल्यास खालील लक्षणे दिसू शकतात :
• मळमळ, उलट्या
• चक्कर येणे
• डोकेदुखी
• लघवी कमी होणे किंवा पिवळी लघवी
• श्वास घेण्यास त्रास, धाप लागणे
• स्नायूंमध्ये वेदना किंवा आकडी
• गोंधळ, दिशाभूल (Confusion)
• पोटदुखी किंवा cramps
• शरीराचे तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढणे
अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात उपचार घ्यावेत.
उपचार
उष्माघात झाल्यास रुग्णालयात खालील उपचार केले जातात :
• शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी IV Fluids
• ORS द्रावण
• शरीराचे तापमान कमी करण्यासाठी Cold Sponging
• थंड पाण्याच्या कपड्याने शरीर पुसणे
• आवश्यकतेनुसार इतर वैद्यकीय उपचार
प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय
उष्माघातावर उपचार उपलब्ध असले तरी उष्माघात होऊच न देणे हाच सर्वात प्रभावी उपाय आहे. योग्य आहार, पुरेसे पाणी, सावलीत राहणे आणि उन्हापासून संरक्षण यामुळे हा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येतो.
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि प्रदूषण नियंत्रणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जबाबदारीने योगदान देणे आवश्यक आहे. पर्यावरण आणि विकास यांचा समतोल राखल्यासच भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित आणि निरोगी वातावरण निर्माण करता येईल.