देशभरासह राज्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय. राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेच्या झळांनी नागरिकांना हैराण केले असून तीन महिन्यांमध्ये देशात जवळपास ५६ जणांचा मृत्यू झालेत. राज्यातही अनेक भागांमध्ये उष्माघातामुळे मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत असून काल छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्माघाताने एकाचा बळी घेतल्याची घटना घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातील पारुंड येथील 33 वर्षीय युवकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. गणेश भाऊसाहेब दौंड असे मृत्यू झालेल्या या युवकाचे नाव आहे. गणेश दौंड हे आडुळ येथून त्याचे काम आटपून गावाकडे निघाले होते.
यावेळी रस्त्यामध्येच त्यांना अचानक चक्कर आली आणि तो एका झाडाखाली बसला. मात्र त्याला उन्हाचा फटका बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने दुपारच्या वेळी नागरिकांनी कामाशिवाय बाहेर जाणे टाळावे आणि उन्हापासून बचावासाठी आवश्यक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, यंदा राज्यासह देशात उष्णतेने उच्चांकी पातळी गाठली होती. वाढत्या तापमानामुळे अनेक जणांचे बळी गेले. गेल्या तीन महिन्यांमध्ये देशात ५६ मृत्यूंची नोंद झाली आहे. ज्यामध्ये मध्य प्रदेशात सर्वाधिक १४ मृत्यूची नोंद झाली असून महाराष्ट्रामध्ये ११ जण उष्माघाताचे बळी ठरलेत.