छत्रपती संभाजीनगर ते जालना या मार्गावर दोन टप्प्यात 5 दिवसांसाठी समृद्धी महामार्ग बंद राहणार आहे.
समृद्धी महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतुक १० ते १२ ऑक्टोबर दरम्यान दुपारी १२ ते ३.३० तर दुसऱ्या टप्प्यात २५ व २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते ३ यावेळात बंद राहणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी दिली.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. हे काम दोन टप्प्यात होणार आहे. इतर कालावधीत या भागातील समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरु राहणार आहे.
असा असेल पर्यायी वाहतुकीचा मार्ग
समृद्धी महामार्गावरील जालना इंटरचेंज (IC-14) ते सावंगी इंटरचेंज (IC-16) दरम्यान समृद्धी महामार्गवरुन नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक, निधोना (जालना) इंटरचेंज IC-14 मधून बाहेर पडून निधोना एमआयडीसी मार्गे- राष्ट्रीय महामार्ग 753 A (जालना-छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज क्र. IC-16 (छत्रपती संभाजीनगर) येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन शिर्डीकडे रवाना होईल.
तर, समृद्धी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक, सावंगी इंटरचेंज क्र. IC-16 (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडून वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुद्ध दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. IC-14 या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे रवाना होईल.