बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आता तपासाला गती मिळाली आहे. प्रकरणात संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड याच्यासह इतरांवर मोक्काही लावण्यात आला आहे. तर कृष्णा आंधळेचा तपास सुरू आहे.
दरम्यान दुसरीकडे बीडच्या पालकमंत्री पदाची सूत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाती घेतील आहेत. तरीही या प्रकरणातील संताप संपलेला दिसत नाही. ज्या क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आली आणि सुरुवातीला प्रकरण ढिलाईने हाताळण्यात आले त्यावरून ही संताप कायम असल्याचे दिसून येते. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्याकडे सूत्र आली. त्यावर मस्साजोगमधील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. आजपर्यंत झालेल्या तपासावर आम्ही समाधानी आहोत कारण मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता शेवटचा गुन्हेगार संपत नाही तोपर्यंत आम्ही हा तपास बंद करणार नाही.
ज्या अर्थी अजित दादांनी पालकमंत्री पद घेतल ते ही गुंडगिरी संपवण्यासाठी घेतलं आहे, असा विश्वास मस्साजोगवासियांनी व्यक्त केला. दादा वाद्यावर पक्के असतात, त्याच्यामुळे आम्हाला शंभर टक्के वाटतं दादा न्याय देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशमुख कुटुंबियांची भावना काय?
छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या निषेध मोर्चात देशमुख कुटुंबीय आम्ही सहभागी होणार आहोत. न्यायाच्या भूमिकेत असताना किती संघर्ष करायची गरज पडली तर आमचं कुटुंब थांबणार नाही. समित्या स्थापन झाल्या आहेत. त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे न्याय भेटला पाहिजे.अजित पवार यांच्याकडून अपेक्षा आहे, बीड जिल्ह्याचे नाव खराब झालं आहे. ही प्रतिमा बदलली पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी दिली.
तर त्यांची मुलगी वैभवी देशमुख हिने पण प्रतिक्रिया दिली आहे. आमची गावाची व महाराष्ट्राची एकच मागणी आहे की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. आता असं वाटते की लवकरात लवकर न्याय मिळेल आणि आम्ही पण तीच अपेक्षा करतो की, आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल, असे ती म्हणाली. अजितदादांनी जे कोणी आरोपी असतील त्यांना मदत करणारे असतील त्यांना सह आरोपी करावे अशी मागणी तिने केली.
छत्रपती संभाजीनगर येथे आज जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी देशमुख कुटुंबिय मस्साजोग येथून छत्रपती संभाजी नगरकडे रवाना झाले आहेत. संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख मुलगी वैभवी आणि मुलगा विराज मोर्च्यात सहभागी होतील.