छत्रपती संभाजीनगर : राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अजूनही सुरु आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत महिलांना अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळत आहे. राज्य सरकारनं आतापर्यंत एक कोटी 59 लाख महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये दिले आहेत. मात्र आता या योजनेचा काही जण गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रकरणं उघडकीस येत आहेत.
नवी मुंबईतील महिलांच्या आधार क्रमांकाचा वापर करुन एका व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण ताजं असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील असाच एक प्रकार समोर आला आहे. कन्नड तालुक्यातील 12 भावांनी महिलांचे फोटो लावून स्वत: अर्ज भरल्याची बाब उघड झाली आहे. या प्रकरणी कारवाईसाठी प्रस्ताव पाठव्यात आला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ मिळावा, यासाठी संभाजी नागरच्या कन्नड तालुक्यातील 12 भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याची बाब महिला व बालकल्याण विभागाच्या निदर्शनास आली आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे. कन्नड तालुक्यात 12 अर्ज असे आले होते, स्क्रुटिनीच्या वेळी ते अर्ज पुरुषांचे असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळं ते रिजेक्ट करण्यात आले आहेत. यात आधार कार्ड महिलांचं आणि नाव पुरुषाचं होतं,अशी माहिती महिला व बाल्य कल्याण विभागाच्या अधिकारी रेश्मा चिमंद्रे दिली.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ पात्र महिलांना देण्यासाठी राज्य शासनाने या योजनेला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कन्नड तालुक्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत 92 हजार 98 अर्ज भरण्यात आले असून त्यातील 90 हजार 957 मंजूर करण्यात आले आहेत, तसेच तांत्रिक कारणाने 428 अर्ज अपात्र करण्यात आले आहेत, तर 357 रद्द केले आहेत.
दाखल करण्यात आलेल्या अर्जाच्या स्वीकृतीसाठी तालुक्याच्या ठिकाणी आलेल्या अर्जाची या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 30 ऑगस्ट रोजी पडताळणी केली असता हा प्रकार समोर आले.
तालुक्यातील 12 जणांनी स्वतःच्या नावाने संबंधित पोर्टलवर अर्ज अपलोड केले. आधार कार्डही स्वतःच्याच नावाचा अपलोड केला, तसेच हमीपत्रही स्वतःच्याच नावाने भरून दिला. पोर्टलवर फोटो मात्र अन्य महिलांचे अपलोड केले. आता या प्रकरणात कारवाई होणार आहे.