"सगळी सोंग करता येतात परंतु पैशांचे सोंग करता येत नाही" ; लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य
img
Dipali Ghadwaje
अर्थमंत्री अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना २१०० रुपये दिले जातील, असं आश्वासन महायुती सरकारने केलं होतं. परंतु निवडणुका होऊन अनेक दिवस झाले. मात्र, अद्याप पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. दरम्यान, आता अजित पवारांनीही याबाबत वक्तव्य केलं आहे.

लाडकी बहीण योजनेत मी २१०० रुपये देणार आहे. पण मलाही हिशोब मांडावे लागतात. पैशाचं सोंग करता येत नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये मिळणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे. नांदेडमध्ये एका कार्यक्रमात अजित पवारांनी याबाबत माहिती दिलेली आहे.

अजित पवार काय म्हणाले?

सरकारी तिजोरीत खडखडात असल्याचे अनेकजण बोलत आहेत. कृपया गैरसमज करुन घेऊ नका. मी राज्याचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये पेन्शन, पगार, राज्य सरकारने काढलेल्या कर्जांचे व्याज जाईल. उरलेले सर्व पैसे लाडक्या बहि‍णींसाठी आहे. विरोधक ही योजना बंद होणार असल्याचे सांगत आहेत. अनेक महिलांनीही १५०० ऐवजी २१०० रुपये देण्याची विनंती केली आहे. मी नाही म्हटलेले नाही. जेव्हा राज्याची आर्थिक परिस्थिती योग्य होईल, तेव्हा लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देणार, असं त्यांनी म्हटलं.

'सगळी सोंग करता येतात. परंतु पैशांचे सोंग करता येत नाही. मला ही योजना सुरु ठेवायची आहे. त्यासाठी आम्ही नवीन पर्याय शोधत आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे. घाबरण्याचं काहीही कारण नाही. तिजोरीत खडखडाट असल्याचे समजू नका. मी आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करतोय', असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group